मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
पावसाळा म्हटलं की मुंबईची तुंबई ही होतेच, दरवर्षी पावसात प्रवाशांचे अनोनात हाल होतात. सध्या मध्य रेल्वेची स्थिती पाहता जरा जरी पावसाला सुरुवात झाली तरी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात होते. याचपार्श्वभूमीवर रेल्वे मार्गात वॉटर लॉगिन होणार नाही यासाठी कल्याण डोंबिवली मनपा आणि शिवसेना ठाकरे गट तसंच रेल्वे अधिकऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे.
कल्याण डोंबिवली भागात पावसाळ्यात ट्रॅकवर पाणी साचल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्याचे खूप हाल होतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच यावर उपाययोजेबाबत बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाला आश्वासन दिले आहे. कल्याणमध्ये चार वर्षांपासून बाकी असलेला लोकग्रामचा एफओबीचे काम पूर्ण करु. त्याचे काम जून पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. लोकग्रामबची बुकींग रुम सुरु करु. महिलांकरीता शौचालयाची आणि पार्किंगची व्यवस्था करु. पावसाळ्यात रेल्वे मार्गात पाणी साचणार नाही यासाठी तातडीने नालेसफाईचे काम केले जाईल. कल्याण पश्चिमेतील रिक्षा चालकांची व्यवस्था करु. प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल. फेरीवाल्यांचा बंदाेबस्त स्थानिक पोलिस, केडीएमसी यांच्या माध्यमातून करु. स्कायवाक वरील गर्दूल्यांचे अड्डे उद्धवस्त करु असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने शिवसेना ठाकरे गटाला दिले असल्याची माहिती जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी दिली आहे.
कल्याण रेल्वे स्थानकातील कार्यालयात यासंदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकी पश्चात जिल्हाप्रमुख बोडारे यांनी ही माहिती दिली आहे. रेल्वे समस्यांबाबत २ मे रोजी रेल्वे प्रशासनाला शिवसेना ठाकरे गटाने निवेदन दिले होते. समस्या सोडविण्यात याव्यात. अन्यथा आम्ही रेल रोको करु अशा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला होता. परंतू रेल्वे प्रशासनाने ती वेळ न येऊ देता. एडीएमआरने पाठवून आमच्या सोबत आज कल्याण रेल्वे स्थानकातील कार्यालयात चर्चा केली असल्याचे जिल्हा प्रमुख बोडारे यांनी सांगितले.
कल्याण मध्ये बैठक पार पडली यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे कल्याण पूर्व शहर प्रमुख शरद पाटील कल्याण पश्चिम शहर प्रमुख बाळा परब शिवसेना ठाकरे पदाधिकारी रुपेश भोईर, शिवसेना ठाकरे गट महिला पदाधिकारी आशा रसाळ, युवा मोर्चाचे पदाधिकारी नीरज कुमार आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सदर बैठकीतील मुद्दे आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पाहता यंदा तरी पावसळ्यात नागरिकांचे हाल होणार नाही अशी आशा चाकरमान्यांकडून व्यक्त केली जात आहे.