
केंद्राकडून राज्यातील दुष्काळाचा आढावा; परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पथक महाराष्ट्रात
केंद्र सरकारची तीन पथके सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, केंद्रीय कृषी विभागाचे सहसचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या पथकात सांख्यिकी विभागाचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग तसेच पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. साक्षी भदोरिया यांचा समावेश आहे.
मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रावरही परिणाम
मराठवाडा आणि विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही दुष्काळाचे गंभीर परिणाम जाणवत असल्याचे राज्य सरकारने केंद्रीय पथकाला सांगितले. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या जिल्ह्यांच्या यादीत चर्चेनंतर काही बदल करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. ज्या भागांमध्ये दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे, त्या ठिकाणी केंद्रीय पथकांकडून प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. तसेच रविवारी किंवा सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय पथकांची बैठक होण्याची शक्यता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
11 ऑक्टोबरला पुन्हा मुंबईत बैठक
प्रत्यक्ष पाहणी पूर्ण केल्यानंतर केंद्रीय पथक मुंबईत परतणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत दुष्काळी परिस्थिती आणि पाहणीदरम्यान आढळलेल्या बाबींवर सविस्तर चर्चा होणार आहे. या दौऱ्यातून राज्यातील दुष्काळाची प्रत्यक्ष स्थिती, पीक नुकसान, पाणीटंचाई आणि आवश्यक मदतीची वस्तुस्थिती केंद्र सरकारसमोर मांडली जाणार आहे. कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह आणि आयुक्त सूरज मांढरे यांनी विविध जिल्ह्यांतील पीक नुकसानीची वस्तुनिष्ठ आकडेवारी केंद्रीय पथकासमोर मांडली.
दुष्काळग्रस्त तालुक्यांना राज्य सरकारकडून दिलासा; लवकरच मिळणार मोफत अन्नधान्य