
नागपूर महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट? दिलेला चेकच झाला बाऊन्स
नागपूर : महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. एका मालमत्ताधारकाकडून अतिरिक्त मालमत्ता कर वसूल करण्यात आला. सुमारे दीड महिन्यानंतर जमा झालेला अतिरिक्त कर परत करण्यासाठी त्याला चेक देण्यात आला. पण तो चेकच बाऊन्स झाला. आता बाऊन्स झालेला चेक परत केल्यास अतिरिक्त रकमेचा आरटीजीएस होईल, असे संबंधित विभागाचे अधिकारी सांगत आहेत.
या सर्व प्रकाराने अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतर वैतागलेला नागरिक आधी आरटीजीएस केल्यास चेक परत करू असे सांगत आहे. आता प्रकरण इथेच अडकले आहे. आपले पैसे कुठेच जात नसल्याची खात्री असल्याचे या नागरिकाचे म्हणणे आहे. मात्र, महापालिकेची तिजोरीत ठणठणाट असल्याचे यातून अंदाज लावला जात आहे.
असे आहे प्रकरण…
गोरेवाडा येथील रहिवासी चंकी सीताराम पांडे यांनी सांगितले की, त्यांनी रुद्राक्ष रेसिडेन्सी, गणपतीनगर, झिंगाबाई टाकळी येथे फ्लॅट घेतला आहे. कर भरण्यासाठी ते महापालिकेच्या कर विभागात गेले. ऑगस्ट 2024 मध्ये, विभागाच्या अधिकाऱ्याने 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2024 या कालावधीतील कराची गणना केली आणि त्यांना 23,656 रुपये भरण्यास सांगितले. ही रक्कम त्यांनी तातडीने जमा केली.
चंकी यांनी सांगितले की, फ्लॅट त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी जानेवारीत महापालिकेत गेले. तिथे कराची सद्यस्थिती तपासली असता जादा कर जमा केल्याचे सांगण्यात आले. 14894 रुपये अधिक जमा झाले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी याच अधिकाऱ्याने कर मोजून रक्कम सांगितली होती. 13 जानेवारी रोजी त्यांच्याकडे जमा केलेली जास्तीची रक्कम परत करण्यासाठी अर्ज करण्यात आला.
दीड महिन्यानंतर दिला चेक
दीड महिन्यानंतर 3 मार्च रोजी पांडे यांना 25 फेब्रुवारी 2025 रोजी 14894 रुपयांचा धनादेश देण्यात आला. पांडे यांनी हा चेक त्याच्या ICICI बँकेच्या खात्यात जमा केला. पण 7 मार्च रोजी चेक बाऊन्स झाल्याचे कळले. खात्यातून बाऊन्स पेनाल्टीही कापण्यात आली. धनादेश घेऊन ते महापालिकेत गेले असता अधिकारी म्हणाले, धनादेश परत करा, आरटीजीएसद्वारे रक्कम हस्तांतरित केली जाईल.