
शहरात ई-बसची प्रतीक्षा वाढली!
प्रकल्पातील विलंबावर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात ओलेक्ट्रा कंपनीसोबत बैठक आयोजित केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिकेने ‘स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन’च्या मदतीने शहरवासीयांसाठी सिटी बस सेवा सुरू केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून शहरासाठी एकूण १०० स्मार्ट बसेस खरेदी करण्याचे नियोजन आहे.
डेपो आणि चार्जिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर
ई-बससाठी शहरातील जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेजारी एक अत्याधुनिक बस डेपो उभारण्यात आला आहे. या डेपोमध्ये नव्या ई-बससाठी स्वतंत्र ई-चार्जिंग स्टेशनचे काम सध्या सुरू आहे, जे पुढील महिनाभरात पूर्ण होईल. आवश्यक सबस्टेशनचे काम पूर्ण झाले आहे.
ओलेक्ट्रा कंपनीशी संपर्क तुटल्याने प्रकल्पाला विलंब
हैदराबादस्थित ओलेक्ट्रा कंपनीकडून शहरासाठीच्या ई-बसेसचा पुरवठा अपेक्षेपेक्षा विलंबाने होत आहे. कंपनी सध्या इतर ठिकाणच्या बसेसचे काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करत असून, ते पूर्ण झाल्यानंतरच संभाजीनगरला बसेस मिळतील, अशी माहिती आहे.
विशेष म्हणजे, याच काळात स्मार्ट सिटी बस विभाग आणि ओलेक्ट्रा कंपनी यांच्यातील संपर्क तुटल्याने प्रकल्पाच्या वेळापत्रकावर अनिश्चिततेचे सावट आले आहे. परिणामी, डिसेंबरऐवजी आता नववर्षातच ई-बसचा शुभारंभ होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.