भेदभाव संपला! जरंडी ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम (Photo Credit - AI)
सोयगाव (वा): आजही आपल्या समाजात मुलींना कमी लेखलं जात. समाजात आजही काही ठिकाणी मुलींबाबत भेदभाव केला जात असला तरी, सोयगाव तालुक्यातील जरंडी या गावाने ही मानसिकता कायमची बदलण्याचा निर्धार केला आहे. ‘मुलगाच हवा’ या विचाराला तिलांजली देत, मुलगा आणि मुलगी एकसमान आहेत हे सिद्ध करण्यासाठी जरंडी ग्रामपंचायतने गेल्या काही वर्षांपासून एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.
जरंडी गावाची ओळख आता ‘मुलीच्या जन्माचे उत्साहाने स्वागत करणारे गाव’ अशी तालुक्यात होऊ लागली आहे. गावात एखाद्या कुटुंबात पहिली मुलगी जन्माला आल्यास, त्या कुटुंबाला ग्रामपंचायतीतर्फे ₹१५०० रोख रक्कम भेट म्हणून दिली जाते. एवढेच नव्हे तर, मुलीच्या आई-वडिलांचा विशेष कार्यक्रम आयोजित करून जाहीर सत्कार केला जातो. यामुळे मुलीच्या जन्माचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण गाव त्यात सहभागी होते. हा उपक्रम ग्रामपंचायतचे सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच संजय पाटील, वंदनाताई पाटील, नीलिमा पवार आणि ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे यांच्या प्रेरणेतून राबविण्यात येत आहे.
जरंडी ग्रामपंचायत केवळ कन्या जन्माचेच नाही, तर गावकऱ्यांत सामाजिक सलोखा आणि आपुलकीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी विविध लोकोपयोगी योजना राबवीत आहे. गावातील कुटुंबात व्यक्ती मृत पावल्यास तत्काळ मदत म्हणून ₹१५०० रोख रक्कम दिली जाते. गावातील मुलीचे लग्न झाल्यावर तिला माहेरची भेट म्हणून ₹११०० चा धनादेश देऊन तिचा सन्मान केला जातो. नवोदय आणि स्कॉलरशिप (शिष्यवृत्ती) परीक्षेत प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीमार्फत ₹११०० रोख रक्कम आणि शालेय शैक्षणिक वस्तू भेट स्वरूपात देऊन त्यांचा सत्कार केला जातो.
सरपंच स्वाती पाटील म्हणताता, “मुलगा-मुलगी यांच्यात भेदभाव केला जाऊ नये, महिलांचा सन्मान व्हावा आणि गावातील सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, या उद्देशाने आम्ही नावीन्यपूर्ण योजना राबवत आहोत. गावाचा विकास आणि उत्थान करणे, हेच ग्रामपंचायतचे मुख्य ध्येय आहे.”
मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दोन कन्यारत्न मातांचा आणि ‘माहेर भेट’ योजनेअंतर्गत अकरा महिलांना ₹११०० च्या धनादेशांचे वाटप करून सत्कार करण्यात आला. अशा प्रकारे जरंडी ग्रामपंचायत लोकसहभाग आणि अभिनव योजनांच्या माध्यमातून गाव विकासाचा नवा आदर्श घालून देत आहे.






