मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; संतोष देशमुखांच्या मुलाच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी
सांगली : बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांनी आपल्या कार्यकाळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले कष्ट वाखाणण्याजोगे आहेत. सामाजिक हितासाठी नेहमी पुढे राहणाऱ्या या नेतृत्वाच्या दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण गावाने एक सक्षम व कर्तव्यनिष्ठ नेता गमावला, या कुटुंबाला सावरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या मुलाची व पुतण्याची पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कायद्यानुसार आवश्यक त्या कारवाईबरोबरच त्यांनी सहवेदना आणि सामाजिक बांधिलकी दाखवून देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. संतोष देशमुख यांचे चिरंजीव विराज देशमुख आणि पुतणे सत्यजित देशमुख यांच्या इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाचे दायित्व स्वतःच्या जबाबदारीवर घेण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. यासाठी त्यांचा प्रवेश रामरत्न एज्युकेशन फाउंडेशन संचालित एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल, रेठरेधरण (ता. वाळवा, जि. सांगली) येथे निश्चित करण्यात आला आहे. या निर्णयाची अधिकृत माहिती मुख्यमंत्री निवासस्थानी वर्षा बंगल्यावर आयोजित छोट्या समारंभात दिली. याबाबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याकडे पत्र सुपूर्द करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही मुलांना प्रेमळ आशीर्वाद व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत, आमदार अभिमन्यू पवार, संचालक सागर खोत, मेजर अमृत पाटील, राहुल मोरे, अमोल पाटील, धनंजय देशमुख, विराज देशमुख, सत्यजित देशमुख, शिरीष देशमुख आदी उपस्थित होते.
जबाबदारी काळजी आणि प्रेमाने पार पाडू
या मुलांना आमदार सदाभाऊ खोत यांच्या एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये प्रवेश देऊन त्यांची जबाबदारी पार पाडण्याचा मान फडणवीस यांनी दिला आहे. ही जबाबदारी पूर्ण निष्ठा, काळजी आणि प्रेमाने पार पाडू, असा विश्वास आमदार खोत त्यांना दिला आहे.
ही केवळ आर्थिक किंवा शैक्षणिक मदत नसून समाजात सकारात्मकता आणि माणुसकीचे मूल्य टिकवण्याचा एक प्रेरणादायी प्रयत्न आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सदैव उभे आहोत.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री