आटपाडीच्या ओढ्यातून 'नोटांचा पूर', लाखो रुपये नागरिकांना सापडले, पाचशेच्या नोटा...
सांगली : चक्क ओढ्याच्या पाण्यामध्ये पाचशेच्या नोटा वाहत आल्याचा प्रकार आटपाडी शहरातील शुक ओढ्यात अंबाबाई मंदिर परिसरामध्ये सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. यावेळी पैसे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. तर अनेकांना पैसे सापडल्याने आनंद निर्माण झाला होता. मात्र हे पैसे कुठून आले याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास काही विद्यार्थी ये- जा करत असताना त्यांना ओढ्यातुन ग. दि माँ पार्ककडे जाणाऱ्या छोट्या पुलाशेजारील ओढ्यामध्ये पाचशेच्या नोटा दिसल्या. यावेळी त्याने पाण्यात जाऊन अधिक पाहिले असता त्यांना पाचशेच्या अनेक नोटा सापडल्या. दरम्यान शनिवारी असल्यामुळे रस्त्यावर भरत असणाऱ्या बाजार करू , व्यापारी व नागरिक मोठ्या प्रमाणात जमले होते. अनेकांनी ओढ्याच्या पाण्यात जाऊन शोध मोहीम घेतली असता त्यांना पाचशे च्या नोटा अनेक नोटा सापडल्या.
दरम्यान हे पैसे कोठून येत आहेत? याबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही. एका प्लास्टिकच्या पिशवी मध्ये पैसे असल्याची चर्चा यावेळी नागरिकांमध्ये होती. तर शनिवारी आठवडा बाजार असल्याने नागरिकांची प्रचंड मोठी गर्दी होती. तर ही बातमी आटपाडी शहरासह संपूर्ण आटपाडी तालुक्यामधून वाऱ्यासारखी पसरली होती. यामध्ये काही जुन्या व नवीन नोटा सापडल्याने मोठी खळबळ माजली होती.