
महाराष्ट्राचा विकास करणारा फायरब्रँड नेता गेला; अजित पवार यांच्या आठवणींनी हळहळला सातारा
साताऱ्याच्या मातीवर विकास निधीच्या माध्यमातून भरभरून प्रेम करणाऱ्या अजित पवार यांच्यानंतर जिल्ह्याच्या विकासाला उंची देणार कोण, अशी भावनिक साद सातारकरांनी घातली आहे. सातारा शहराच्या कास धरणाची उंची असो अथवा सातारा शहरातील छत्रपती धर्मवीर संभाजीराजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या निधीचा प्रश्न असो, अजिंक्यतारा किल्ल्यासाठी भरभरून निधी देण्याचा विषय असो, अजित पवार यांनी कधीच निधीचा हात आखडता घेतला नाही. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या राजकीय कारकीर्दीच्या पहिल्या टप्प्यात विशेषता: अभयसिंहराजे भाेसले यांच्या मृत्यूनंतर असलेल्या संघर्षाच्या काळात अजित पवार शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागे वडिलकीच्या नात्याने हक्काने उभे राहिले.
शरद पवार यांच्यानंतर कार्यकर्त्यांची तोंडपाठ नावे असणारा व कार्यकर्त्याला काम होणार की नाही, हे जागेवर सांगणारा नेता काय असतो, हे अजित पवार यांनी १९९९ ते २००२ या दरम्यानच्या पालकमंत्री पदाच्या काळात जिल्ह्याला सांगितले. सातारा जिल्ह्यातील राज्य महामार्ग असो जिल्हा महामार्ग असो त्यासाठी डीपीडीसीमधून कोट्यवधी रुपयांच्या सुविधा देणारे अजित पवार खचितच जिल्ह्याने पाहिले.
राजकारणाचे जोडे बाहेर ठेवणारे रसायन
सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणात सुद्धा सहकाराच्या प्रांगणात राजकारणाचे जोडे बाहेर ठेवणारे अजित पवार वेगळेच रसायन होते. काका शरद पवार यांच्या मूळ राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर अजित पवार यांचा पुन्हा राजकीय संघर्ष सुरू झाला तो महाराष्ट्राने आणि साताऱ्याने सुद्धा पाहिला. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांना राजकीय पाठिंबा देऊन राष्ट्रवादी पुन्हा सातारा जिल्ह्यात रुजवण्यासाठी धडपडणारे पवार अचानक जेव्हा जातात तेव्हा सातारकरांचे मन सुद्धा त्यांच्यासाठी हळवं होतं.
कास धरण, अजिंक्यताऱ्यासाठी तरतूद
शिवेंद्रसिंहराजे यांनी कास धरणाच्या आठ मीटर उंचीचा प्रस्ताव ठेवला होता, तेव्हा १२ मीटर उंची करावयाची महत्त्वपूर्ण सूचना करून त्यासाठी ६० कोटी रुपयांची तरतूद केली. सातारा शहराच्या अस्मितेचा मानबिंदू असणारा अजिंक्यताऱ्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी अंदाजपत्रकात ५० कोटी रुपयांची तरतूद करणाऱ्या अजित पवार यांनी साताऱ्याची आपली नाळ कधीही तुटू दिली नाही. कोरेगाव तालुक्यातील नांदवळ पवार कुटुंबीयांचे तसे मूळ गाव. त्यामुळे अजित पवार स्वतःला मूळचे सातारकरच मानत असत.
जिल्ह्याने अनुभवला करारी बाणा
अजित पवार यांचा करारी बाणा सातारा जिल्ह्याने वेळोवेळी अनुभवला आहे. साताऱ्यात नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अजित पवार यांचे भाषण ऐकण्यासाठी बऱ्याच जणांची गर्दी झाली होती. मात्र राजकीय व्यस्ततेमुळे पवार येऊ शकले नाही, मात्र औंध येथील संगीत महोत्सव आणि संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त अजित पवार यांचा राहिलेला उत्स्फूर्त वावर व दोनच महिन्यापूर्वी कोल्हापूरवरुन येणारे अजित पवार अचानक साताऱ्याच्या सर्किट हाऊसमध्ये दाखल झाले तेव्हा तेथील फुटलेली फरशी पाहून त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले होते. विकास कामांतील हयगय पवार यांना कधीही खपली नाही. साताऱ्यात पोवई नाक्यावर राष्ट्रवादी भवनाच्या उभारणीत त्यांनी प्रशासनाची चांगलीच हजेरी घेतली.
प्रीतीसंगमावर केला आत्मक्लेष
एरवी कर्तव्य कठोर वाटणारे अजित पवार राजकीय आयुष्यामध्ये एकदा आक्षेपार्ह विधान बोलून गेले मात्र त्यानंतरचा आत्मक्लेष त्यांनी कराडमध्ये येऊन प्रीतीसंगमावर केला होता. ही पश्चाताप बुद्धी सुद्धा साताऱ्याने अनुभवली. त्यांच्यातला एक हळवा आणि संवेदनशील आणि सजग कार्यकर्ता सुद्धा अनुभवला. मकरंद पाटील यांच्या आग्रहामुळे सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनिमित्त अजित पवार यांची साताऱ्यात जाहीर सभा होणार होती, मात्र बारामतीतच त्यांचे दुर्दैवी विमान अपघातात निधन झाल्याने वाईत होणारी सभा होऊ शकली नाही, याचा चटका संपूर्ण साताऱ्याला लागून राहिला आहे.