
Chakan Alandi road forest pollution news, illegal garbage dumping Pune forest
कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये प्लास्टिक, रासायनिक पदार्थ, अन्नाचे उरलेले अवशेष, औद्योगिक घाण, बांधकामातील अवशेष यांचा समावेश असून हे सर्व खुलेआम वनक्षेत्रात टाकले जात आहे. काही ठिकाणी या कचऱ्याला आग लावली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे निर्माण होणारा धूर आणि दुर्गंधी यामुळे हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर खालावली आहे.
या ठिकाणी कचरा जळल्यामुळे केवळ झाडे व वनस्पतींचे नुकसान होत नाही, तर परिसरातील पक्षी, वन्य प्राणी आणि जनावरांचेही जीवन धोक्यात येत आहे. कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या रासायनिक धुरामुळे वातावरण प्रदूषित होत असून मातीची सुपिकता कमी होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. हिवाळ्याच्या काळात हा धूर अधिक प्रमाणात हवेत तरंगतो आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.
या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी व पर्यावरण प्रेमी संस्थांनी अनेक वेळा वनविभाग व पंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. वनविभागाने दुर्लक्ष केल्याने कचरा टाकणाऱ्यांचे मनोबल वाढले असून, दररोज रात्रीच्या वेळी डंपर, टेम्पो किंवा दुचाकीने कचरा फेकण्याच्या घटना घडत आहेत.
चाकण आणि आळंदीदरम्यान ये-जा करणारे नागरिक, वाहनचालक आणि पर्यावरणप्रेमी या स्थितीबद्दल संताप व्यक्त करत आहेत. वनक्षेत्रात कचरा टाकणाऱ्यांवर आणि आग लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तसेच वनविभागाने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, नियमित गस्त वाढवावी आणि स्वच्छतेसाठी विशेष पथक नेमावे, अशी मागणीही होत आहे.
सध्या या भागातील वनसंपत्ती धोक्यात आली असून, वेळेत उपाययोजना न केल्यास आगामी काळात मोठे पर्यावरणीय संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वनअधिकारी इंदलकर यांनी सांगितले की, “चाकण–आळंदी रस्त्यालगत वनक्षेत्रात अनधिकृतपणे कचरा टाकण्याचे प्रकार गंभीर असून याबाबत वनविभागाकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वनक्षेत्रात कचरा टाकणे हा कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित ठिकाणी नियमित पाहणी व गस्त वाढविण्यात येणार आहे. तसेच कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनीही वनक्षेत्र स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे व अशा घटना आढळल्यास त्वरित वनविभागाला माहिती द्यावी.