राज-उद्धव यांनी एकत्र यावं आणि क्रिकेट खेळावं; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला
राज्य सरकारने राज्यात तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्यभरातून वाढता विरोध आणि राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी संयुक्त मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. “दोन भावांनी एकत्र येऊ नये असा जीआर मी काढलाय का? त्यांनी एकत्र यावं, क्रिकेट खेळावं, जेवण करावं. आम्हाला काही फरक पडत नाही,” अशा शब्दांत फडणवीसांनी टोला लगावला आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, मी कुणालाही एकत्र येण्यास कधीच रोखलं नाही. दोन भावांनी एकत्र येणं, खेळणं, गप्पा मारणं हा आमच्यासाठी विषयच नसल्याचं ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, ठाकरे बंधू ज्या जीआरला विरोध करत आहेत, त्याची शिफारस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच विश्वासातील नेत्याने केली होती. “तो अहवाल उद्धव ठाकरेंनीच मान्य केला होता. त्यामुळे आज विरोध करणं हे दुटप्पीपणाचं लक्षण आहे,” असं सांगत त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
ते पुढे म्हणाले की, त्रिभाषा सूत्राबाबत अंतिम निर्णय एक समिती घेणार आहे. “या निर्णयात कोणत्याही पक्षाचं नव्हे, तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेतलं जाईल. कुणाच्याही दबावाखाली आम्ही निर्णय घेणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
हिंदी विरोधी मोर्चा काढण्याच्या ठाकरे बंधूंच्या तयारीला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने आधीच हिंदी संबंधित जीआर रद्द केले आहेत. त्यामुळे आता त्यांनी मोर्चा काढायचा की विजयी यात्रा, याचं त्यांना स्वातंत्र्य आहे, असं सांगत त्यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा आणि त्यावर फडणवीसांनी दिलेलं उत्तर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
भाजप महाराष्ट्र प्रेदशाध्यक्ष निवडीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपमध्ये लोकशाही प्रक्रिया आहे. १२०० मंडळांच्या निवडणुकीनंतर, आम्ही जिल्हाध्यक्षांच्या निवडणुका पूर्ण केल्या आणि आता अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र निवडणुकीचे प्रभारी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू देखील उपस्थित आहेत. रवींद्र चव्हाण यांचा अर्ज दाखल झाला आहे. उद्या, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत, नव्या अध्यक्षांच नाव जाहीर केलं जाईल. जर ते महाराष्ट्र भाजप अध्यक्षपदासाठी एकमेव उमेदवार असतील तर त्यांचं नाव जाहीर केले जाणार आहे. पण जर अधिक अर्ज आले तर निवडणूक होईल. रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात पक्ष नवी उंची गाठेल”, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.