‘प्रार्थना स्थळांवरील भोंगे बंद होतील, पण सकाळच्या ९ च्या भोंग्याचं काय?’; फडणवीसांचा संजय राऊतांना टोला
संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर कधी कधी स्वकीयांवरही टिकेचे बाण सोडत असतात. त्यानंतर दिवसभरात त्याचे पडसाद उमटतात. यावर महायुतीच्या अनेक नेत्यांनी सकाळचा भोंगा बंद झाला पाहिजे, अशी गमतीत प्रतिक्रिया दिली होती. हाच धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, प्रार्थना स्थळावरील भोंग्यांचा विषय बंद होईल पण सकाळच्या भोंग्याचं काय करायचं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आज विधानसभेत प्रार्थना स्थळ आणि मशिदींवरील भोंग्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा मुद्दा लक्षवेधी सुचनेद्वारा मांडला. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देताना त्या म्हणाल्या, प्रार्थना स्थळात जाऊन अजाण म्हणणे हा अधिकार असला तरी भोंग्यावर अजाण म्हणण्यास न्यायालयाने विरोध केला होता. भोंगा हा कुठल्याही धर्माशी निगडित नाही, असं न्यायालयाने सांगितल्याची आठवण फरांदे यांनी करून दिली. या लक्षवेधीला उत्तर देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रार्थना स्थळावरील भोंग्यांचा विषय मांडत असताना रोज सकाळी वाजणाऱ्या भोंग्याचं काय करायचं?, असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर खोटक टिप्पणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोणत्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावण्याआधी परवानगी घेतली पाहिजे. रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत भोंगे बंद असले पाहिजेत. दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४४ डेसिबलची आवाज मर्यादा असली पाहिजे. कायद्यानुसार अधिक डेसिबलने भोंगे वाजत असतील तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत. पोलिसांनी याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवायचं आहे, अशी सध्या कायद्याची तरतूद आहे. मात्र याचा अवलंब सध्या होताना दिसत नाही.
त्यामुळे यापुढे कुणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही. निश्चित कालावधीकरताच भोंगे लावता येतील. त्यानंतर पुन्हा भोंगे लावायचे असल्यास संबंधितांनी पुन्हा पोलिसांकडून परवानगी घ्यावी. ज्याठिकाणी आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन होईल, त्यांना पुन्हा परवानगी दिली जाणार नाही. तसेच भोंग्यांची जप्ती केली जाईल. तसेच या नियमांचे तंतोतंत पालन होत आहे की नाही? हे पाहण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल. जर पोलीस निरीक्षकांनी याचे तंतोतंत पालन केले नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं लक्षवेधीचे उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केलं.