कुर्ला: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान २० तारखेला मतदान होणार आहे आणि २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत प्रमुख लढत होणार आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ला विधानसभा मतदारसंघात सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे. एकनाथ शिंदे यांनी कुर्ला मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. दरम्यान महायुतीची देखील ही पहिलीच प्रचारसभा होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाण साधला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुर्ला येथील सभेत बोलताना म्हणाले, “मंगेश कुडाळकर हे ओपनिंग बॅट्समन झालेले आहेत. आता तुम्हाला या मॅचमध्ये चौकार-षटकार मारायचे आहेत. तर बाकी लोकांना क्लीन बोल्ड आणि डिपोझिट गुल करायचे आहे. दिवाळी आहे. फटाके फुटत आहेत. मात्र २३ तारखेला आपला ॲटम बॉम्ब फुटणार आहे. आता पुढील काही दिवस महायुतीच्या सभा होतील. आजही महायुतीची सभा आहे. ”
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “माझ्या लाडक्या बहिणीना, खास करून भाऊबीजेच्या शुभेच्छा देतो. आता तुम्हाला केवळ वर्षालाच नव्हे तर, दर महिन्याला भाऊबीज मिळणार आहे. माहेरचा आहेर दर महिन्याला तुम्हाला मिळणार आहे. आम्ही देणारे आहोत. हे विरोधी पक्षाचे नेते लाडकी बहीण योजना बंद होईल, ही योजना आम्ही बंद करू, असे म्हणतात. खोडा घालणाऱ्यांना तुम्ही जोडा दाखवणार की नाही? या योजनेच्या विरोधात ते हायकोर्टात देखील गेले. हायकोर्टाने त्यांना चांगलेच झापले. कॉँग्रेस आणि महाविकास आघाडीची लोक नागपूर खंडपीठात देखील ही योजना बंद करण्यासाठी गेले. आता तर यांचे सरकार आले तर या योजना बंद करू असे हे म्हणत आहेत. त्यांना वाटत असेल लाडकी बहिणीला पैसे देणारा गुन्हेगार आहे, तर असे मी असा गुन्हा १० वेळा करण्यासाठी तयार आहे. आम्ही लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढवू. ”
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. २० तारखेला मतदान आणि २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान महायुती आणि महविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रचारसभा सुरू झाल्या आहेत. विकासाचा मुद्दा घेऊन महायुती जनतेसमोर जात आहेत. दरम्यान राज्यात तिसरी आघाडी देखील तयार झाली आहे. तसेच लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका बसणार का हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.
“