नाशिक : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ‘चलो मुंबई’चा नारा दिल्यानंतर राज्य सरकारने (State Govt) तातडीने पाऊले उचलत मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) जीआर काढला. या जीआरमध्ये (Reservation GR) ‘सगेसायरे’ शब्द देखील असल्यामुळे राज्यभरामध्ये मराठा समाजाने जल्लोष करत या निर्णयाचे स्वागत केले. मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन मागे घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ज्युस घेत उपोषण सोडले. यानंतर राज्यांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया येत असून आता संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा आरोप केला आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे म्हणाले, “मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांना बगल देऊन हा अध्यादेश काढण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार चुकीचा आहे. सरकारला मुळात 57 लाख नोंदी सापडल्याच नाही. त्यामुळे शासनाने मनोज जरांगे पाटील यांची दिशाभूल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपर्यंत जे काही बोलले ते सर्व धादांत खोट आहे,” असा गंभीर आरोप मनोज आखरे यांनी केला आहे.
पुढे त्यांनी राज्य सरकारला टोला लगावत मनोज आखरे म्हणाले, “मराठा आणि कुणबी हे वेगवेगळ्या पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. पण मुख्यमंत्री यांनी सगेसोयरे याचे स्पष्टीकरण द्यावे. शासनाने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. हेतू पुरस्कर मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली आहे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा ही मागणी अद्याप अपूर्णच आहे. पितृसत्ताक सोबत मातृसत्ताक विवाह ग्राह्य धरावे. मनोज जरांगे यांची दिशाभूल होत आहे पण ते त्यांना कळल नसेल,” असे मत मनोज आखरे यांनी व्यक्त केले.
मनोज आखरे यांनी भुजबळांवर निशाणा साधला असून “भुजबळांना जर सामाजिक जाण असती तर त्यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचं काम केलं नसतं. भुजबळ यांनी 2 जातीमध्ये तेढ निर्माण करून भांडण लावण्याचं काम केलं आहे. भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांचा मोहरा म्हणून काम करत आहेत,” अशी टीकाही मनोज आखरे यांनी केली.