मुंबई: केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्याच्या योजनांमुळे बचत गटाच्या माध्यमातून महिला उद्यमशील बनत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अधिक बळकट होत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभागामार्फत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय समारोप व कन्यारत्न यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथे करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल बोलत होते.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, विभागाचे आयुक्त नयना गुंडे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, महिला स्वंसहाय्यता गटाच्या सदस्य उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले की, कुटुंबासह देशाच्या विकासासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. आज सन्मानित करण्यात आलेल्या महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहेत. प्रधानमंत्री यांच्या निर्णयानुसार संरक्षण विभागाच्या तिन्ही दलांमध्ये महिलांना काम करण्याची संधी मिळाली आहे आणि तिथेही त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.
विकसित भारतासाठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महिलांच्या योगदानाशिवाय देशाचा विकास होणे शक्य नाही. 2047 मध्ये विकसित भारताचे उद्दिष्ट पूर्ण करताना यामध्ये मातृशक्ती, स्त्री शक्तीचा मोठा वाटा असणार आहे. 2029 मध्ये राजकीय क्षेत्रात मिळणाऱ्या आरक्षणामुळे संसद व विधीमंडळात महिलांची संख्या 33 टक्के होणार असल्याने राजकीय क्षेत्रातही महिला राज येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्यासमवेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या विशेष रुपे कार्डचे अनावरण केले. यावेळी त्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात 'बँक ऑफ महाराष्ट्र' यांच्या खातेदार असलेल्या प्रमोदीनी… pic.twitter.com/YW1ibgITQd — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 8, 2025
सामाजिक बंधनातून खडतर प्रवास करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतीबा फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, विधवा पुनर्विवाह सुरू करुन केशवपन प्रथा बंद केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उत्तम प्रशासक होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ होत्या अशा शक्तीरुपी स्त्रियांचा विचार आणि आदर्श घेऊन काम केल्यास सर्वांगीन प्रगती साध्य करता येईल.
लोकसंख्येत 50 टक्के महिला असून, महिलांना केंद्रस्थानी ठेऊन मानव संसाधन विकसित केल्यास देश विकसित होईल हे प्रधानमंत्री मोदी यांनी ओळखले आणि म्हणूनच ‘लेक लाडकी’ ते ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘लखपती दीदी पर्यंत योजना सुरू केल्या. या योजना राज्यात प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील बालविवाह बंद झाले आहेत आणि लिंगभेदाचे, भ्रूणहत्येचे प्रमाण कमी झाले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांनी सुरू केलेल्या क्रेडिट सोसायटीचा विस्तार वाढवून उद्योगात आपले अस्तित्व मजबूत करायचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.