CM of Maharashtra Devendra Fadnavis visits Panipat on Shaurya Din 2025
पानिपत : आज पानिपत शौर्य दिन संपूर्ण राज्यभरामध्ये उत्साहाने साजरा केला जात आहे. पानिपतमध्ये जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पानिपत येथे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे डॉ. नितीन धांडे यांचा शौर्य पुरस्कार देऊन गौरव देखील करण्यात आला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हुतात्मा सैनिकांना अभिवादन केले.
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पानिपत ही एक मराठी माणसाची भळभळती जखम आहे. पण त्याचवेळी मराठी माणसाचा अभिमान देखील पानिपत आहे. ज्या प्रकारे मराठ्यांनी पानिपतच्या युद्धामध्ये शौर्य दाखवलं. अतिशय विपरित परिस्थितीमध्ये मराठी सैनिक लढले. ही खरं म्हणजे युद्धाच्या इतिहासातील ही अत्यंत मोठी गोष्ट आहे. या शौर्यानंतर अनेक मराठी सैनिक वीरगतीला प्राप्त झाले. यानंतर देखील मराठ्यांनी कधी हार मानली नाही,” अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “यानंतर पुन्हा एकदा पुढील 10 वर्षांनंतर मराठ्यांनी भगवं राज्य प्रस्थापित केलं. आणि दिल्ली देखील जिंकून दाखवली. म्हणून ही मराठ्यांची जी वीरता आणि शौर्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य प्रस्थापित केलं आणि जे स्थापन केले. ज्यानंतर छत्रपती शिवरायांच्या आशिर्वादाने संपूर्ण भारतामध्ये ते पसरवण्याचं काम आपल्या मराठ्यांनी केलं. त्यात पानिपत ही अशाप्रकारची लढाई आहे, ज्यामध्ये जरी तांत्रिकदृष्या मराठ्यांचा पराभव झाला तरी मराठे कधी हारले नाहीत. आणि शौर्य अधिकाधिक वाढवलं ज्यानंतर कोणाला भारतावर अशाप्रकारे आक्रमक करण्याची हिंमत झाली नाही,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिहासाच्या शौर्याची पुन्हा आठवण करुन दिली.
पुढे फडणवीस म्हणाले की, “आम्ही शौर्य भूमीला वंदन करण्यासाठी आलो. मी शौर्य भूमीच्या ट्रस्टचे मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. आमचा इतिहास जिवंत ठेवण्याच काम त्यांनी केलं. या ठिकाणी मातृभूमीकरता धारातीर्थी पडलेल्या मराठ्यांना ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने आदरांजली-श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम चालतो. मराठ्यांच्या शौर्याच संवर्धन करण्याच काम ट्रस्ट करतय म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो” असं देवेद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ट्रस्टसोबत माझी चर्चा झाली आहे. काही गोष्टी त्यांनी लक्षात आणून दिल्या आहेत. इथलं स्मारक अधिक चांगल्या पद्धतीने कसं करता येईल, त्यासाठी जे जे आवश्यक असेल, त्यात महाराष्ट्र सरकार पुढाकार घेईल” यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर पानिपतला येणारे तुम्ही महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आहात, यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मंगल भूमीला वंदन करण्यासाठी येणं हे मी माझं सौभाग्य मानतो. जेव्हा-जेव्हा मला संधी मिळेल, मी इथे येत राहीन” असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
जातीच्या राजकारणावरुन फडणवीसांचा टोला
त्याचबरोबर सध्या सुरु असलेल्या जातींपातींमधील राजकारणावरुन देखील देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले की, “शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यात अठरापगड जाती एकत्र होत्या. लोक एकत्र येऊन मावळे म्हणून लढले. त्यांनी स्वराज्य विस्तारीकरणाच काम केलं. आम्ही एकत्र राहिलो, तर सुरक्षित आहोत. पुन्हा जाती-पातीमध्ये विभाजन झालं, तर प्रगती करता येणार नाही. शिवाजी महाराजांनी भगव्या झेंड्याखाली आम्हाला सर्वांना एकत्र आणलं. आता भगव्या झेंड्याखाली आणि भारताच्या तिरंग्याखाली एकत्र येणं गरजेच आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.