
"महापालिका, राजकीय नेतृत्व, क्रेडाईसह..."; Sangli च्या विकासाबद्दल काय म्हणाले आयुक्त सत्यम गांधी?
सांगलीत ड्रीम होम २०२५’ वास्तू प्रदर्शनाचे उद्घाटन
सांगलीची वाटचाल विकसित शहराकडे – सत्यम गांधी
महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांचा डीपीआर तयार करतोय – गांधी
सांगली: सांगली महापालिका क्षेत्रात रस्ते, पाणी, ड्रेनेज, सार्वजनिक वाहतूक यासह अनेक पायाभूत सुविधांसह शहर विकासाचे प्रकल्प सुरू आहेत. सांगलीला स्वच्छ, सुंदर, विकसित शहर बनवायचे आहे. महापालिका, राजकीय नेतृत्व, क्रेडाईसह शहरातील सर्व घटकांच्या सहकायनि पश्चिम महाराष्ट्रात सांगलीची वाटचाल विकसित शहराकडे होत आहे, असा विश्वास आयुक्त सत्यम गांधी यांनी व्यक्त केला.
येथील नेमिनाथनरमध्ये क्रेडाई सांगली आयोजित ‘ड्रीम होम २०२५’ या भव्य वास्तू प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन आयुक्त सत्यम गांधी यांच्याहस्ते झाले. क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे अध्यक्षस्थानी होते. क्रेडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सह-खजिनदार दशरथ शेटे प्रमुख पाहुणे होते. क्रेडाई सांगलीचे अध्यक्ष सुनील कोकितकर, सचिव दिलीप पाटील, खजिनदार जयेश हरिया, उपाध्यक्ष आनंदराव माळी, प्रमोद शिंदे, उत्तम आरगे, बरिष्ठ कार्यकारी सदस्य राजेश गंगवानी तसेच माजी अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, रवींद्र खिलारे, जयराज सगरे उपस्थित होते.
Sangli Election : सांगली महापालिका निवडणूक राष्ट्रवादी ताकदीने लढणार, महायुतीला प्राधान्य; पण…
प्रदर्शनामध्ये सांगली, मिरजेतील प्रॉपर्टीज, फ्लॅट, रो हाऊसेस,व्यावसायिक गाळे, गृहसजावटीचे साहित्य, बांधकाम साहित्य आणि गृह फायनान्स कंपन्या, बँकांचे ११० पेक्षा जास्त स्टॉल सहभागी आहेत. यावेळी क्रेडाई सांगलीचे संचालक धवल शहा, राजेश कुलकर्णी, शीतल पाटील, राहुल घारगे, इम्रान मुल्ला, शैलेश पवार, संतोष अष्टेकर, आदित्य बावडेकर, रोहन मेहता, प्रदीप पोतदार, युथ को ऑर्डिनेटर महेश जामदार, वुईमेन्स विंग को-ऑर्डिनेटर योगिता येडेकर तसेच सभासद, नागरिक उपस्थित होते.
शहर विकासाची कामे
आयुक्त गांधी म्हणाले, शहरातून राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांचा डीपीआर तयार करत आहोत. सांगलीवाडीतून कोल्हापूररोडला जोडणारा रिंगरोड तयार करणार आहोत. त्यासाठी जमीन अधिग्रहण नोटीस दिल्या जात आहेत. प्रधानमंत्री ई-बस योजनेंतर्गत ५० इलेक्ट्रिक बसेस मार्च-एप्रिलपासून शहर व शेजारील ग्रामीण भागात धावतील. पूर नियंत्रण व साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ६०० कोटी रुपयांच्या कामांसाठी कार्यारंभ आदेश एक ते दीड महिन्यात दिला जाईल, वारणा पाणी योजनेच्या ४५० कोटी रुपयांचा प्रस्तावाला गती देत आहोत. धामणी रोड परिसरात नवीन जलकुंभ बांधले जाईल. सांगलीत भाजीमंडई उभारली असून मिरजेतही भाजीमंडई उभारली जाणार आहे. सांगलीत काळीखण येथे कारंजे, लेसर शो सुरू केला आहे.
” सांगली शहराचा विकास होत आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी मोठी संधी आहे. विकास आराखड्यातील आरक्षणांचा विकास करण्यासाठी अॅकोमोडेशन रिझर्व्हेशनमधील तरतुदींचा लाभ घ्यावा. जीएसटी, रेरा या अनुषंगिक अडचणी क्रेडाईच्या अधिवेशनात मांडल्या जाणार आहेत.
– प्रफुल्ल तावरे
” महापालिका क्षेत्र विकसित होत आहे. राष्ट्रीय महामार्गाशी कनेक्टीविटीमुळे सांगली व मिरजेतील प्रॉपर्टीजचे दर वाढणार आहेत. म्हणूनच गुंतवणुकीचा एक सर्वोत्तम पर्याय म्हणून सर्व नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी.
-सुनील कोकितकर