
Latur ZP Elections 2026: लातूर महानगरपालिका विजयानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज!
Latur ZP Elections 2026: लातूर महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत आणि ऐतिहासिक यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी लातूर जिल्हा परिषद निवडणूक २०२६ साठी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर लातूर शहरातील काँग्रेस भवन येथे लातूर व रेणापूर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या, या प्रक्रियेत जवळपास ४५१ इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केल्याने काँग्रेसमधील उत्साह आणि ताकद प्रकर्षाने दिसून आली. मुलाखतींच्या दिवशी काँग्रेस भवन परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. ही अभूतपूर्व उपस्थिती पाहता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेस आपली विजयाची परंपरा कायम राखेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला.
हेही वाचा: Ambajogai Court News: अंबाजोगाई न्यायालयाचा मोठा निर्णय! जमीन खरेदी प्रकरणात मुंडेंना कोर्टाचा झटका
लातूर व रेणापूर तालुक्यातील अनेक गटांसाठी एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार पुढे आले आहेत. प्रत्येक इच्छुकाने आपल्या समर्थकांसह ताकद दाखवत उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले. विशेषतः तरुण आणि महिला इच्छुकांची संख्या लक्षणीय होती. उमेदवार निवडीत स्थानिक प्रश्नांची जाण, जनसंपर्क, संघटनात्मक काम आणि पक्षनिष्ठा या निकषांवर भर दिला जात असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सक्षम आणि जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार निवडण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वतः उपस्थित राहून इच्छुकांचे म्हणणे ऐकून घेतले. यामध्ये खासदार डॉ. शिवाजी काळगे, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख, लातूर ग्रामीण विधानसभा समन्वयक डॉ. जितेंद्र देहाडे, जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश बेद्रे, रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद कापसे उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस व वंचित आघाडीने ७० पैकी ४८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या विजयामुळे ग्रामीण भागातील कार्यकत्यांचे मनोबल प्रचंड वाढले असून हा विजय जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ‘बूस्टर डोस’ ठरल्याचे चित्र आहे. विलासराव देशमुख यांच्या विचारांचा हा विजय असून तोच वारसा जिल्हा परिषद निवडणुकीतही कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी नेत्यांनी व्यक्त केला. मुलाखती देण्यासाठी इच्छुकांबरोबरच त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
लातूरच्या जनतेने पुन्हा एकदा काँग्रेसवर विश्वास दाखवला असून महानगरपालिकेप्रमाणेच जिल्हा परिषदेतही काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता सज्जा असल्याचे मत खा. डॉ. शिवाजी काळगे यांनी व्यक्त केले. मुलाखतीनंतर उमेदवारांची अंतिम यादी कधी जाहीर होणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.