मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते? हर्षवर्धन सपकाळांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
मुंबई : डान्स बार प्रकरणात आरोपांची राळ उठलेल्या राज्याच्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साथ देत त्यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळत आहे. योगेश चिंता करू नको, मी तुझ्या पाठिशी आहे, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. यावरुन आता काँग्रेस पक्षाने एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदे यांच्या टीका केली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी संबंधित डान्सबारचे एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे समर्थन केले आहे, हा निर्ल्लजपणाचा कळस असून ‘जनाची नाही तर मनाची तरी बागळा’, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
सपकाळ म्हणाले, भाजपा युती सरकार हे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, सत्तेला चिकटून राहण्यासाठी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार, पदाधिकारी व मंत्र्यांनीच ताळतंत्र सोडले असे नाही तर मुख्यमंत्रीपद भूषवलेले व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘कंबरेचे सोडून डोक्याला बांधले’ आहे. अशीही टीका सपकाळ यांनी केली आहे.
भाजपा युती सरकार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईतील कांदिवलीमध्ये ‘सावली’ नावाचा डान्सबार सुरु होता, या डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकला, या डान्सबारमध्ये सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे ‘एफआयआर’मध्ये नमूद केलेले आहे. हा डान्सबार आपल्या पत्नीच्या नावाने आहे याची कबुली गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वडील माजी मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे, असे असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या डान्सबारचे समर्थन कसे काय करत आहेत? हिंदुत्वाच्या विचारासाठी उठाव केला म्हणणाऱ्या शिदेंनी डान्सबार मध्ये मुली नाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते? हा कसला विकास व कोणाचा विकास आहे? यावरही प्रकाश टाकावा, असं सपकाळ म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, ‘काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्यांनी डान्सबर बोलू नये’, असे म्हणणारे एकनाथ शिंदेच भाजपाच्या इशाऱ्यावर कठपुतलीसारखे नाचत आहेत. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातील डान्सबारला बंदी केली होती याची एकनाथ शिंदे यांनी माहिती घ्यावी आणि मगच काँग्रेसवर बोलावे. लाखो लोकांचे संसार उद्धवस्त करणारी डान्सबार संस्कृती हवीच कशाला?, एकीकडे लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून मिरवता आणि त्याच बहिणींचे संसार मोडीत काढणाऱ्या डान्सबारचे समर्थन कोणत्या तोंडाने करता? गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी झालीच पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एकनाथ शिंदे यांच्या विधानावर खुलासा करावा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.