हर्षवर्धन सपकाळांचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांना महत्वाचं आवाहन, म्हणाले; आता 272 जागांवर...
मुंबई : काँग्रेस पक्षातून काही लोक गेले पण ही सुद्धा नवीन नेतृत्वाला संधीच आहे. विधानसभेच्या २८८ जागां आहेत आणि यावेळी काँग्रेसचे १६ आमदार निवडून आलेले आहेत. आता २७२ जागांवर नेतृत्व करण्याची संधी युवक काँग्रेसला आहे. लोकांच्या प्रश्नांवर संघर्ष करा. काँग्रेस विचार सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे तो विचार कानाकोपऱ्यात पोहचवत समाजाला अभिप्रेत असणारे संघटन उभे करा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष शिवराज मोरे यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, उपाध्यक्ष शरद आहेर, रामचंद्र आबा दळवी, आमदार हेमंत ओगले, कर्नाटक युवक काँग्रेस अध्यक्ष मंजुनाथ गौडा शरद आहेर, प्रदेश सरचिटणीस जितेंद्र देहाडे, ब्रिज भूषण दत्त, शाह आलम, प्रा. बालाजी गाडे, विश्वजित हाप्पे आनंद सिंग, करिना झेवियर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीतही नवीन व तरुण चेहऱ्यांना जास्त संधी देण्यात आलेली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होत आहेत. कोणाला संधी मिळते मिळते नाही याची वाट न पाहता पक्षाचे काम करा. संघटनेत झोकून देऊन काम केले, लोकांच्या प्रश्नांवर संघर्ष केला की संधी नक्की मिळते. विचार व कामाची कटिबद्धता कायम ठेवा. युवक काँग्रेसमध्ये काम केलेल्या अनेकांना काँग्रेस पक्षात महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. संघटनेचे काम करा व भविष्यातील नेतृत्व तयार करा, असे सपकाळ म्हणाले.
नवनियुक्त युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यावेळी म्हणाले की, हे पद भूषवताना अनेक आव्हानं उभी आहेत पण राज्यात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फौज उभी करू. जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे युवक काँग्रेस मदतीला धावून जाईल. युवकांचे प्रश्न हाती घेऊन आंदोलने केली जातील. बुथ सक्षम करा मग दिल्ली दूर नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी युवक काँग्रेसने आजपासून कामाला लागावे, असे मोरे म्हणाले.
कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. कावड यात्रा ही भारताला किंवा महाराष्ट्राला काही नवीन नाही पण वराह जयंती साजरा करावी अशी मागणी जर सत्ताधारी पक्षातील लोक करत असतील तर ते संतापजनक व निषेधार्ह आहे. त्यांचा अजेंडा स्पष्ट असून तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीचा हा त्यांचा अजेंडा आहे, असे सपकाळ म्हणाले.
सपकाळ पुढे म्हणाले की, या सरकाला फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार एवढेच माहित आहे, त्यामुळे मोनोरेलची जी घटना घडली तसे प्रकार घडत आहेत. मुंबईची अवस्था बकाल करून ठेवली आहे. मुंबई महानगरपालिकेत हजारो कोटी रुपयांच्या ठेवी होत्या त्या कुठे गेल्या, हा प्रश्न आहे. सरकारने यावर एक श्वेतपत्रिका काढावी, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले..