मुंबई : देशपातळीवर भाजपला पराभूत करण्यासाठी आता विरोधक आक्रमक झाले आहेत. मागील आठवड्यात नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद व काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक पार पडली. देशात भाजपाविरोधी (BJP) वातावरण तयार करण्यासाठी आणि विरोधकांना एकत्र आणण्यासाठी दिल्लीत विरोधी पक्षाच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. यानंतर आता देशात भाजपाविरोधी मोट बांधण्यासाठी विरोधक आक्रमक झाले असून, काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी आज ‘मातोश्री’वर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली.
‘मातोश्री’वर झालेल्या भेटीनंतर वेणुगोपाल यांनी याबाबत माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, ‘आज मी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरेंच्या लढ्यात काँग्रेस त्यांच्या खंबीरपणे पाठीशी आहे. आता आम्ही मोदींच्या हुकूमशाहीविरोधात लढणार आहोत. लोकशाही वाचविण्यासठी काँग्रेस ठाकरेंसोबत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना दिल्लीला चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे’, असेही त्यांनी सांगितले.
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र : उद्धव ठाकरे
याच संवादात उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘आम्ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलो आहे. एक वर्षही नाही आता निवडणुका येत आहेत. भाजपसोबत आम्ही 25 वर्षे होतो. पण मित्र कोण, विरोधी कोण हे भाजपला समजले नाही. काहींनी शिवसेनेत गद्दारी करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही आता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलो आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
अनेक नेत्यांची उपस्थिती
मातोश्रीवर झालेल्या या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाई जगताप यांच्यासह खासदार संजय राऊत आणि इतर नेतेमंडळी उपस्थित होती.