रश्मी शुक्लांबाबत नाना पटोलेंचं राज्यपालांना पत्र; म्हणाले, यांना आता...
मुंबई : वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून संजय वर्मा यांची नियुक्ती करताना निवडणूक आयागाने तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नसतानाही राज्य सरकारने मात्र निवडणुक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करत तात्पुरती नियुक्ती असा आदेश काढलेला आहे. रश्मी शुक्ला यांची पुन्हा नियुक्ती ही बेकायदेशीर, चुकीचा पायंडा पाडणारी व पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अन्याय करणारी ठरेल. राज्य सरकारकडून रश्मी शुक्ला यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पोलीस सेवेत घेऊ नये यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल यांना पत्र पाठवून केली आहे.
राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले पुढे लिहितात की, रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी केल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना पदावरून हटवले आहे. परंतु त्यांना पुन्हा पोलीस महासंचालक पदी नियुक्त करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे आमच्या निदर्शनास आल्याने निवडणूक आयोगालाही या प्रकरणी हस्तक्षेप करण्यासाठी पत्र पाठवले आहे परंतु अद्याप त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. या प्रकरणी राज्यपाल महोदयांनी हस्तक्षेप करावा असे पटोले यांनी म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा : शंकर जगताप यांना निवडून द्या, मी तुमच्यासाठी…; नितीन गडकरी यांचं मोठं आश्वासन
रश्मी शुक्ला यांना निवडणुकीनंतर पुन्हा डीजीपीपदी नियुक्त करण्याचा राज्य सरकारचा काही इरादा असेल तर तो कायदेशीर व प्रशासकीय गुंता निर्माण करणारा ठरू शकतो. सशर्त अटीमुळे पोलीस महासंचालकांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम करणारा ठरतो. निवडणुक काळापुरता पोलीस महासंचालक व निवडणुकीनंतरचा पोलीस महासंचालक अशा नियुक्तीमुळे प्रशासकीय संबंधित मूलभूत घटनात्मक तत्त्वे, पदानुक्रम आणि अधिकाराचे पृथक्करण यावर परिणाम होतो. राज्य सरकारच्या या कृतीमुळे घटनात्मक संतुलनाला बाधा पोहचून कायदेशीर अनिश्चितता उद्भवू शकते. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करावा असे नाना पटोले यांनी या पत्रात म्हटले आहे.
फोन टॅपिंग प्रकरणात नाव चर्चेत
रश्मी शुक्ला यांचे नाव राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचं सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. शुक्ला या राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी संजय राऊत, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता.