shivendra raje
सातारा : संपूर्ण महाराष्ट्र हा छत्रपतींच्या विचारांवर चालत आहे. मात्र, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानादिवशी जर साताऱ्यात डीजे वाजवत असतील तर ते अतिशय वेदनादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारसदारांनी बलिदानादिवशीच आलेल्या आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्ते डीजे वाजवत असतील तर कार्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे. गादीबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा चालवला पाहिजे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर नाव न घेता केला.
सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीत दिवसभर झालेल्या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार, सातारा जिल्हा कॉंग्रेसचे निरीक्षक म्हणून प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर प्रथमच साताऱ्यात आल्यानंतर सावंत यांनी जिल्हाचा आढावा घेतला.
सचिन सावंत म्हणाले, ‘कॉंग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे तळमळीचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळेच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांना महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. राज्यात आता कॉंग्रेसच्या मजबूत संघटनासाठी बदलाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण, राज्य आणि देशात सुरू झालेले राजकारण हे देशाला अस्ताकडे नेणारे आहे. विरोधी पक्षच संपवण्यिाचा प्रयत्न होतोय. जाती, धर्मात संघर्ष व्हावा अशीच भूमिका आहे’.
लोकशाही वाईट स्थितीत आली
देशात 11 वर्षांपासून भाजप सत्तेत असून लोकशाही वाईट स्थितीत आलेली आहे. यासाठी कॉंग्रेसला रस्त्यावर उतरुन विरोध करावा लागणार आहे. अशावेळी राज्यातील जनतेलाही कॉंग्रेसला साथ द्यावी लागेल. कारण, विरोधी विरोधी पक्षच राहिला नाहीतर जनतेच्या मुलभूत प्रश्नांना वाचा फोडणाराच कोणी राहणार नाही.
…तर मग भाजपला इतर पक्षांची गरज काय?
जगातील मोठा पक्ष म्हणून भाजप सांगते. मग, त्यांना इतर पक्षातील नेत्यांची गरजच काय? असे सांगून सचिन सावंत पुढे म्हणाले, निवडणुकीतील आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. लाडक्या बहिणींना २ हजार १०० रुपये दिले नाहीत. महाराष्ट्र तर कर्जात बुडालाय, उद्योगक्षेत्रात पिछेहाट झाली आहे, हे सर्व सोडून औरंगजेबच्या कबरीचा, दिशा सालियन सारखे प्रश्न उपस्थित करुन लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविले जात आहे.
काँग्रेस पक्ष आता मजबूत करायचाय
सचिन सावंत म्हणाले, कॉंग्रेस पक्ष मजबूत करायचा आहे. यासाठी बुथपर्यंत पोहोचणार आहोत. संविधानावरील आक्रमण रोखण्यासाठी लोकांनीही कॉंग्रेसला साथ द्यावी लागणार आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या प्रश्नावर सावंत यांनी ही निवडणूक सरकारी वकिलांच्या माध्यमातून पुढे ढकलली जात आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही आवश्यकता तेथे एकत्र येणार आहोत. तरीही कॉंग्रेस नेतृत्व ठरवेल त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.