'स्थानिक'च्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा प्लॅन, एकत्र लढणार की स्वबळावर? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं
पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरी उघड केल्यावनंतरही त्यावर निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिलेले नाही. खरे तर निवडणूक आयोगाचे काम निपक्षपाती असणे गरजेचे आहे. मात्र, निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे, असा आरोप काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यातील काँग्रेस भवन येथे चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हानिहाय आढावा बैठक झाली. यानिमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सह प्रभारी बी. एम. संदीप, विधान परिषदेतील गटनेते व निरीक्षक सतेज (बंटी) पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, गोपाळ तिवारी पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा व तालुका अध्यक्ष, आजी माजी पदाधिकारी, विविध आघाड्या व सेलचे प्रमुख बैठकीस उपस्थित होते.
चेन्नीथला म्हणाले, महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी मत चोरीचा प्रकार उजेडात आणला आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहेत. देशातील नागरिक प्रत्येक निवडणुकीवर संशय व्यक्त करत आहेत. मात्र, आयोगाकडून त्याला उत्तर दिले जात नाही. यावरून आयोग भाजपसाठी काम करते, हे सिद्ध होते. आताही सरकारला निवडणूक घेण्यात रस नाही. पण, न्यायालयाचे आदेश असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेतल्या जात आहेत, असा दावाही चेन्नीथला यांनी केला.
शेतकऱ्यांना तात्काळ मदत आवश्यक
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये आलेल्या पूरामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणे गरजेचे आहे. मात्र, राज्य सरकारने आतापर्यंत कुठली मदत दिलेले नाही. मुख्यमंत्री व इतर मंत्री मदतीबाबत काही बोलत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे पूरग्रस्तांसाठी मदत मागितली. मात्र, पंतप्रधानांनी ना मदत जाहीर केली ना केंद्रीय मंत्री किंवा पथक पाठवले, असेही चेन्नीथला म्हणाले.
निवडणुकीसंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढायची की युती किंवा आघाडीच्या माध्यमातून लढायची, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे स्वातंत्र त्या-त्या जिल्ह्यातील व तालुक्यातील नेत्यांना देण्यात आले आहे, याचा पुनरुच्चार कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. तसेच पक्षाचा निर्णय महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनाही कळवल्याचेही त्यांनी नमूद केले.
सतेज पाटील म्हणाले, राहुल गांधी यांनी मत चोरीच्या माध्यमातून खिडकी उघडली आहे, आता आपल्याला दार उघडायचे आहे. तीन महिन्यात निवडणुका संपणार आहेत, त्यामुळे सर्वांनी सोशल मिडियावर सक्रिय होणे गरजेचे आहे. तसेच पदविधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका लागणार आहेत. त्या दृष्टीने आपण पदविधर नोंदणी करणे गरजेचे आहे.
राहुल गांधींनी महाराष्ट्राचा दौरा करावा
महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला, नागरिकांना सरकारने अद्याप मदत केलेली नाही, असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. या परिस्थितीमध्ये काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचा दौरा करून शेतकऱ्यांशी व नागरिकांशी संवाद साधावा, यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रयत्न करावेत.
लोकसभा निवडणुकीत आम्ही एकसंघ काम केल्याने यश मिळाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत आम्हाला अति आत्मविश्वास व तिकीट वाटपातील गोंधळ यामुळे नुकसान झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र आम्ही मत विभाजन टाळून चांगले यश संपादित करू. यावेळीही मतचोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे मतदार याद्या तपासणे गरजेचे आहे, असे मत प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.