सौजन्य- team navrashtra
मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवार (27 जून) पासून सुरू होत आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. राज्य सरकारला कोंडीत पकड़ण्यासाठी महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत झालेल्या बैठकीत केंद्रीय नेतृत्त्वाने राज्यातील नेत्यांना सूचना दिल्या आहेत.
यात, राज्य सरकार भ्रष्ट आहे असा संदेश अधिवेशनातून जाऊ द्या, राज्य सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढा, अधिवेशनात आक्रमकपणे मुद्दे मांडा. राज्य सरकारचा कारभार भ्रष्ट आहे, असा संदेश जनतेत जाऊ द्या, लहान भाऊ मोठा भाऊ या वादात पडू नका, अशा सुचना दिल्याची माहिती समोर आली आहे.
त्याचबरोबर काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची मंगळवारी दिल्लीत राज्यातील नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या बॅनरखालीच लढवल्या जातील. या मुद्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना लवकरच महाराष्ट्राबाबत घटक पक्षांची समन्वय समिती स्थापन करून एकत्रित रणनीती आखण्यास सांगितले असल्याचे सांगण्यात येत आहे. माध्यमांसमोर जी काही भूमिका किंवा ओळ येईल, ती कोणत्याही एका पक्षाची नसून आघाडीची असावी, असाही एक प्रमुख उद्देश आहे.
तर दुसरीकडे, महाविकास आघाडीने शेतकरी कर्जमाफी, दुधाला कमी भाव, नीट परीक्षा घोटाळा, बोगस बियाणे – बेरोजगारीस अटल सेतू भेगा, शेतकऱी कर्जमाफी अशा मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. तसेच, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केले जाते. पण राज्य सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावरही विरोधकांनी बहिष्कार टाकल्याची माहिती आहे. राज्यात शेतकऱ्यांचा प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माणझालेला असताना सरकार गंभीर नसल्याचे सांगत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला आहे.