नदीपात्रात राडाराेडा टाकण्याचे काम सुरूच; पुण्याला पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता, पालिकेचे दुर्लक्ष
पुणे: मुठा नदीचे पात्र हे डंपिंग ग्राऊंड झाले आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकतेच शहराला पुराच्या पाण्याचा फटका बसला हाेता. त्यानंतर नदीपात्रालगत टाकण्यात आलेला दाेनशे डंपर इतका राडाराेडा काढला गेला. परंतु पुन्हा एकदा नदीत बांधकामाचा राडाराेडा टाकण्यात येत आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या जाेरदार पावसामुळे खडकवासला धरणसाखळीतून मुठा नदीत माेठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला हाेता. तेव्हा शहराच्या विशेषत: सिंहगड रस्ता भागातील एकतानगर भागाला फटका बसला हाेता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ आदी नेत्यांनी या भागाची पाहणी केली हाेती. नदीत कमी वेळेत जास्त पाणी साेडले गेल्याने हा पुर आल्याचा दावा केला जात हाेता.
नदीपात्रात आणि काठावर माेठ्या प्रमाणावर राडाराेडा टाकण्यात आल्याने शहरात पुरस्थिती निर्माण झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला गेला. तसेच एकतानगर भागात आणि त्यापुढील भागातुन सुमारे दाेनशे डंपर इतका बांधकामाचा राडाराेडा काढण्यात आला हाेता. मुठा नदीच्या पुर रेषेत सुमारे ५ एकर क्षेत्रावर भराव टाकून भला मोठा प्लॉट तयार केल्याचे समोर आल्यानंतर आता पुन्हा नदीपात्रात भराव टाकण्यास सुरूवात झाली. सिहंगड रस्त्यावरील एकता नगरच्या पलिकडील कर्वे नगर वारजेच्या नदीपात्रात डंपरच्या डंपर खाली केले जात आहेत. पुरामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाल्यानंतरही महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने भविष्यात पुन्हा पुराचा धोका निर्माण होणार आहे.
यंदा शहर आणि धरणक्षेत्रात मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला गेला. केवळ ३५ हजार क्युसेस विसर्गामुळे पुण्यातील सिंहगड रस्त्यासह नदीकाठच्या भागांमध्ये अनेक सोसायट्या, घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले. नाले, रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. पावसाच्या या हाहाकारामुळे पुण्यातील नदीकाठच्या सिंहगड रस्ता परिसतारील विठ्ठलनगर, एकतानगरी, निंबजनगर, पाटील इस्टेट, शांतीनगर, तसेच, येरवडा, पुलाचीवाडी आदी भागात कंबरे इतके पाणी होते. या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. नदीकाठलगतच्या परिसरात आपला जीव वाचवण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरू होती. तब्बल ५ हजार नागरिकांचे स्थलांतर करावे लागेले. तर, विविध दुर्घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला होता.
पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत
पुरजन्य परिस्थितीनंतर मुळा-मुठा नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पाच्या नावाखाली महापालिकेने नदीमध्ये भराव टाकून नदीचे पात्र अरूंद केल्यामुळेच पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले असून यास भाजपच कारणीभूत असल्याची टिका राजकीय पक्षांसह पर्यावरणप्रेमींकडून झाली. सर्व क्षेत्रातून टिका झाल्यानंतर झोपी गेलेल्या महापालिका प्रशासनाला जाग आली. या आरोप आणि टिकांमुळे पालिकेने कारणे शोधायला सुरूवात केल्यानंतर पालिकेला कर्वे नगर ते शिवणे या भागातील नदीपात्राच्या पुररेषेत सुमारे चार ते पाच एकर क्षेत्रात भुखंड तयार केल्याचे समोर आले. मात्र, प्रत्यक्षात ही जागा १५ ते २० एकर असल्याचे बोलले जात आहे. राडारोड्यामुळे नदीपात्रात एक भींत तयार झाली आहे. या भरावामुळे नदीने तिचे पात्र सोडल्याने सिंहगड परिसरात पाणी शिरल्याचा आरोप केला गेला. मात्र, जवळपास पावसाळा संपत आल्याने महापालिकेला या सर्व गाष्टींचा विसर पडला. त्यामुळे पुन्हा बेकायदा भराव टाकून प्लॉट करण्याचे उद्योग सुरू झाले. याकडे लक्ष न दिल्यास भविष्यात पुणेकरांना याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
आयुक्तांनी प्रतिक्रिया देणे टाळले
नदीपात्रात भराव टाकल्याची गोष्ट महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी यावर प्रतिक्रीया देणे टाळले. त्यामुळे भराव टाकून नक्की कोणाचे भले करायचे आहे असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.