
फोटो सौजन्य - Social Media
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, एसटी बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात अनधिकृत प्रवासी वाहतूक, प्रवासी चढवणे-उतरणे किंवा नियमबाह्य पार्किंग आढळल्यास संबंधित वाहनांवर थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स, वडाप, काळी-पिवळी टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ५ ते १५ जूनदरम्यान ३०६ वाहनांवर कारवाई करून ४ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर १ ते १० जुलै या दहा दिवसांत आणखी २७० वाहनांवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड आकारण्यात आला. संबंधित वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
प्रशासनाच्या मते, बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी वाढत होती. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. काही ठिकाणी प्रवाशांना जबरदस्तीने खासगी वाहनांत बसविण्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि एसटी स्थानक परिसरात शिस्त राखण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईचा सकारात्मक परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही झाला असून, अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आल्याने बुलढाणा एसटी विभागाच्या महसुलात तब्बल ७४ लाख रुपयांची वाढ झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. नागरिकांनी एसटी स्थानक परिसरात नियमांचे पालन करून अधिकृत एसटी सेवेचा वापर करावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.