उरुळी कांचन : कोरेगाव मुळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सदस्याने चक्क महिलकडे शरीर सुखाची मागणी करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका ग्रामपंचायत सदस्या विरोधात लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन गुलाब निकाळजे (रा. कोरेगाव मुळ, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ३० वर्षीय पिडीत महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १३ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता व १७ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या काम करुन घरी जात असताना आरोपी सचिन निकाळजे याने चारचाकी गाडीतून फिर्यादीचा पाठलाग केला आणि फिर्यादी यांना थांबविले. आरोपीने त्यांचा हात पकडून तू मला खूप आवडतेस, तु मला हवी आहेस, असे म्हणून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
दरम्यान, आरोपीने फिर्यादी यांच्या घरात प्रवेश करुन त्यांची साडी ओढून शरीर सुखाची मागणी केली. फिर्यादी यांनी धक्का दिला असताना त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच झाल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.