
Crime and police efficiency in Nandade are a topic of discussion due to the Saksham Tate murder case
नांदेड : जिल्ह्यात खून, दरोडे, एटीएम चोरी, दुचाकी चोरी तसेच चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, काही महिन्यांपासून गुन्हेगारीचा आलेख सतत चढत असून ग्रामीण तसेच शहरी भागात रात्री बाहेर फिरण्यासही लोक घाबरत आहेत. नांदेड ग्रामीण, भाग्यनगर, किनवट, उमरी, बारड, भोकर आणि मुदखेड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुनांच्या घटना वाढल्याचे सांगितले जात आहे.
यातील काही घटनांबाबत पोलिसांच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ग्रामीण परिसरात घडलेल्या एका खूनप्रकरणात जुगार व्यवसायातील वादातून घटना घडल्याचा आरोप असून, स्थानिकांच्या मते संबंधित तपासात निष्पक्षता ठेवावी, अशी अपेक्षा आहे. उमरी येथे घडलेल्या ऑनर किलिंग प्रकरणातही नागरिकांनी गंभीर आरोप करत पोलिसांनी अधिक दक्षता घेतली असती तर घटना टाळता आली असती, संबंधित व्यक्तीची प्रथम धिंड काढण्यात आल्यावर त्याची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे ह्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. पोलिसांनी वेळीच दक्षता घेतली असती तर हा प्रकार टळला असता. मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही. उलट येथील एका पोलिस अधिकाऱ्याला बेस्ट डिटेक्शन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
भाग्यनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पावडेवाडी भागात जुन्या वादातून झालेल्या खून प्रकरणात काही संशयितांना वारंवार ठाण्यात बोलावून चौकशीच्या नावाखाली मानसिक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप आहे. ही घटना देखील टाळता आली असती, मात्र पोलिसांनी वेळीच पावले उचलायला हवी होती, दुर्दैवाने तसे इथेही झाले नाही.
हे देखील वाचा : राजकीय पक्षांपेक्षा कायदा महत्त्वाचा; टीकाकार नेत्यांना निवडणूक आयोगाचा दणका!
२७ नोव्हेंबर रोजी नांदेड शहरातील इतवारा भागात झालेल्या सक्षम ताटे खून प्रकरण अख्ख्या देशात गाजत आहे. ह्या प्रकरणात इतवारा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्याने फूस लावल्याने माझ्या मुलाचा खून झाल्याचा आरोप सक्षमच्या आईचा आहे. प्रेयसी अंचल हिने देखील पोलिसांवर आरोप केले आहेत. पोलिस उप महानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले खरे. चौकशी होईल. कारवाई होईल. पोलिस निलंबित होईल, हे सर्व खरे असले तरीही आज सक्षम गेला, त्याची उणीव कोणी भरुन काढणार आहे का? एका आईला मुलगा गमवावा लागला, हे भरून निघणार आहे काय? हा खरा प्रश्न आहे.
दरम्यान, माहूर तालुक्यात झालेला दोन जावांचा खून, चिमुकल्या मुलीवर शिक्षकाने केलेला बलात्कार यासह अन्य घटनांमुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लागले होते. जिल्ह्यात एटीएम फोडणे, चेन चोरी, घरफोड्या अशा घटनांतही वाढ झाली असून मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांमध्ये भयाची भावना निर्माण झाली आहे. वाढत्या गुन्हेगारीपुढे पोलीस प्रशासनाने तातडीने वाढीव गस्त, तंत्रज्ञानाधारित तपास आणि ठोस प्रतिबंधक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या घरी लगीनगाई! परदेशात पार पडणार विवाहसोहळा, राष्ट्रवादीच्या केवळ दोन नेत्यांनाच आमंत्रण
अशीही चर्चा कामगिरीची…
सध्या पोलीस उपमहानिरीक्षक असणारे शहाजी उमाप यांनी आपल्या पोलिस अधीक्षकपदाच्या कार्यकाळात नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले होते, आजही त्यांच्या कार्यपद्धतीची आदरयुक्त चर्चा सर्वत्र केली जाते. रविंद्र सिंघल, मनोजकुमार शर्मा, लक्ष्मीकांत पाटील अशा बहाद्दर पोलिस अधिकाऱ्याऱ्यांनी नांदेडमध्ये चमकदार कामगिरी केली होती. फार लांब जायची गरज नाही, अगदी अलीकडे चंद्रकिशोर मीना नांदेडला पोलिस अधीक्षक असताना गुन्हेगार चळचळ कापायचे. त्यांच्या काळात गुन्हेगारी खूप कमी झाली होती. याबाबीचीही चर्चा आता सुरू आहे.
खरंच आपण सुरक्षित आहोत का? नागरिकांचा सवाल
राजकीय, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक दृष्ट्या नांदेड जिल्ह्याची वेगळी ओळख राज्य नव्हे तर अवघ्या देशभरात असून तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून नांदेडची ओळख देशभरात आहे, अनेक व्हीव्हीआयपींची ये जा नांदेडला सुरू असते, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने नांदेडचा विचार करायचा झाल्यास नांदेडची वाटचाल आता पूर्वीच्या बिहारप्रमाणे सुरू आहे. खुलेआम देशी कट्टे विक्री बोकाळलेले अवैध व्यवसाय, खून, दरोडे, बलात्कार आदी गंभीर वाढते गुन्हे आदींमुळे सर्वसामान्य जनता भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. खरेच आपण सुरक्षित आहोत का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.