
Crime News : लोणावळ्यातील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांनी दिली 'ही' धक्कादायक माहिती
याप्रकरणी राहूल तारूवर लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. चार गुन्ह्यांची नोंद असतानाही राहूल तारू याने शस्त्र परवाना मिळवण्यासाठी खोटा पत्ता, बनावट भाडेकरार (रेंट अॅग्रीमेंट) आणि चुकीचे शपथपत्र तसेच राहूल ऐवजी भूषण असे नाव असल्याचे बनावट कागदपत्रे सादर करून शासन व पुणे पोलिसांची दिशाभूल केली होती. तर पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळविला होता. हा परवाना २०२२ मध्ये त्याने मिळविला होता. त्याला एका एजंटने मदत केल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, राहूलने ४ नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे पोलिस आयुक्तालयात शस्त्र परवाना मिळण्यासाठी अर्ज केला होता. अर्जासोबत त्याने आपण लोणी काळभोर परिसरातील स्वप्नशील सोसायटीत भाड्याने राहत असून, आपले नाव भूषण तारू असल्याचे दाखवले. यासाठी त्याने भाडेकरार, शपथपत्र तसेच इतर कागदपत्रे सादर केली. या कागदपत्रांमध्ये त्याच्यावर कोणताही गुन्हेगारी खटला दाखल नसल्याचा दावा करण्यात आला होता. या कागदपत्रांवरून त्याला पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना देखील मंजूर केला. मात्र राहूल स्वप्नशील सोसायटीत वास्तव्यास नसल्याचे उघड झाले. पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन केलेल्या चौकशीत आरोपीने शस्त्र परवाना मिळवण्याच्या उद्देशाने खोटा भाडेकरार तयार करून जाणूनबुजून चुकीची माहिती दिल्याचे स्पष्ट झाले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने शस्त्र परवाना मिळवला होता.
असा आला प्रकार उघडकीस
२१ जानेवारी २०२६ रोजी तो लोणावळा परिसरात मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी गेल्यानंतर त्याठिकाणी दोघांत वादविवाद झाले. यातून त्याने हवेत गोळीबार केला. दोनवेळा त्याने गोळी झाडली. दरम्यान, गोळीबाराची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाल्याचे निदर्शनास आले. लोणावळा पोलिसांनी राहुल तारूला पौड परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे परवाना असलेले पिस्तूल होते. पोलिसांनी गोळीबार प्रकरणाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला असता त्याने नावात बदल करून हे पिस्तूल घेतल्याचे समोर आले. त्याने हा परवाना मिळवताना भूषण तारू असे नाव सांगितले आहे. वास्तविक पाहता त्याचे नाव राहूल तारू असे आहे. अधिक तपासात त्याने बनावट कागदपत्रे सादर करून ते घेतल्याचे निदर्शनास आले.
भूषण उर्फ राहुल तारू याच्यावर यापूर्वी पुणे शहरातील विविध पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सहकारनगर पोलीस ठाण्यात २०००, २००६ आणि २०११ मध्ये, तसेच बंडगार्डन पोलिस ठाण्यातही त्याच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मात्र ही माहिती आरोपीने अर्ज करताना जाणूनबुजून लपवली होती.