वसई : विरारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने २० लाख रुपयांच्या मॅफेड्रॉन अंमली पदार्थासह दोन आरोपींना अटक केली आहे. मनवेल पाड्यातील मोहक सिटी जवळ दोन आरोपी मॅफेड्रॉन अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती विरार गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळाली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी तिथे दुचाकीवरून दोन संशयित आरोपी आले.
त्यांच्यावर झडप घालून अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे १९ लाख ४० हजार रुपये किमतीचा मेफेड्रॉन अंमली पदार्थ, वजन काटा आणि एक बुलेट दुचाकी असा २० लाख ९० हजार ६३० रुपयांचा ऐवज सापडला. त्यामुळे या दोघांना अटक करण्यात आली असून मोहमद इशाक शेख (३४) आणि मोहमद मोईनुद्दीन शेख (२५) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी विरार पोलिसांनी एनडीपीएस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.