DCM Ajit Pawar visits Solapur and meets farmers affected by heavy rains and floods
Ajit Pawar Solapur Visit : सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती, घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.24) नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. त्यांनी सोलापूर दौरा करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर मदतीचे आश्वासन देखील शेतकऱ्यांना दिले.
कोर्टी (ता. करमाळा), मुंगशी (ता. माढा), लांबोटी (ता. मोहोळ) या भागांतील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी आमदार नारायण आबा पाटील, अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता धीरज साळी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदी उपस्थित होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, करमाळा, माढा, मोहोळ तालुक्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन करावे, त्यांना अन्न, पाणी, वीज व औषधांची सुविधा पुरवावी, तसेच ज्यांचे धान्य भिजले आहे त्यांना तात्काळ धान्य उपलब्ध करून द्यावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे उडीद, मका, सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, घरांचे व पशुधनाचेही नुकसान झाले आहे. सर्व नुकसानग्रस्त घटकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी महामुनी मंगल कार्यालय, संगोबा रोड, करमाळा येथे तात्पुरते पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
देवेंद्र फडणवीसांचा सोलापूर दौरा
त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सोलापूर दौरा केला आहे. सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहे. शेती पिकांचे जनावरांचे घरांचे व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झालेले असून पूरग्रस्त नागरिकांनी अशा संकटाच्या काळात धीर धरावा, राज्य शासन संकटकाळात पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून नागरिकांना सर्वोतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना या गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. अतिवृष्टी व पूर आल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.