
Sachin Ahir: इंजिनिअरिंग प्रवेशाचा खर्च वाढला! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे तीनपट शुल्क तातडीने रद्द करावे, अशी मागणी शिवसेना सचिव ॲड. वैभव मारुती थोरात यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्याकडे निवेदन दिले आहे. Sachin Ahir:
मात्र, मॅनेजमेंट कोट्याचे शुल्क नियमित शुल्काच्या तीनपट झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबांतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही शुल्कवाढ शिक्षणाच्या संधीवरच मर्यादा आणणारी ठरत असल्याचे ॲड. थोरात यांनी निवेदनात म्हटले आहे.
“एकाच महाविद्यालयात, एकाच वर्गात, एकाच अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याकडून नियमित शुल्क आणि दुसऱ्या विद्यार्थ्याकडून त्याच्या तीनपट शुल्क आकारले जाणे हे शैक्षणिक समानतेच्या दृष्टीने कितपत योग्य आहे?” असा सवालही ॲड. थोरात यांनी उपस्थित केला आहे.
शिक्षणामध्ये समान संधी आणि समानतेचे तत्त्व महत्त्वाचे असताना, केवळ प्रवेशाचा मार्ग वेगळा असल्यामुळे विद्यार्थ्यांवर एवढा मोठा आर्थिक भार टाकणे अन्यायकारक आहे. या निर्णयाचा थेट परिणाम विद्यार्थी आणि पालकांच्या आर्थिक परिस्थितीवर होत असून, त्यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे मॅनेजमेंट कोट्यातील तीनपट शुल्क आकारण्याचा अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा आणि याबाबत संबंधितांना त्वरित आवश्यक ते आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी ॲड. वैभव थोरात यांनी केली आहे.
दरम्यान, याबाबत उपसभापती सचिन अहिर यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मॅनेजमेंट कोटा तीन पट शुल्क कमी करण्याबाबत संबधित विभागाबरोबर चर्चा करून शुल्क रद्द करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.