राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील युतीच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्येही मनोमीलन होत असल्याचे चित्र दिसत होते, ज्यामुळे संभाव्य युतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते.
पण त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरे यांची भेट घेतली आणि राजकीय समीकरणात बदल होऊ लागले. लक्षणीय बाब म्हणजे, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका आणि वक्तव्यांमुळे दोन्ही पक्षांमधील संभाव्य युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना ‘चमचा’म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला. देशपांडेंच्या या टीकेवर संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिले. आता देशपांडे यांनी पुन्हा एकदा ट्विटर एक्स या प्लॅटफॉर्मवर ठाकरे गटावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे.
Stock Market Today: घसरणीसह होणार आज शेअर बाजाराची सुरुवात? तज्ज्ञांनी काय सांगितलं? जाणून घ्या
“होय, आम्ही नवीन आहोत, पण कधी ‘केम छो वरळी’ म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत. ‘जिलेबी अने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं कधी म्हटलं नाही. मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी 20 हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाहीत. आम्हाला अभिमान आहे की आम्ही नवीन आहोत. तुम्ही जुने असून काय उपटली?”
संदीप देशपांडेंच्या या पोस्टमुळ मनसे व ठाकरे गटातील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटातील नेते, विशेषतः संजय राऊत यांचे यावर काय प्रत्युत्तर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर राजकीय विश्लेषकांच्या मते, संदीप देशपांडे यांची ही भूमिका केवळ व्यक्तिगत मत नसून, मनसेची अधिकृत भूमिका असेल, तर मनसे-ठाकरे गट युतीचे दार जवळपास बंद झाल्याचे मानले जाऊ शकते.
महत्त्वाची बाब म्हणजे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट अशा दोन्ही बाजूंच्या पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, स्थानिक पातळीवरील दोन्ही ठाकरे बंधुंच्या चाहत्यांपर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीविषयी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पण संदीप देशपांडे मात्र सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. संजय राऊत यांच्यावर टीका करत, “‘युतीबद्दल दोन्ही पक्षप्रमुख निर्णय घेतील ताटातल्या चमच्याने ताटात राहावं’, अशी टीका संदीप देशपांडेंनी यांनी केली होती.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर केलेल्या तीव्र टीकेनंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही परखड प्रत्युत्तर दिले आहे. “राजकारणात माणसाने नेहमी संयमी आणि आशावादी असावं लागतं. काही लोकांना अजून त्याचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. नुसता उथळपणा करून राजकारण चालत नाही,” अशा शब्दांत राऊतांनी देशपांडे यांना सुनावले.
“जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांचा प्रश्न असतो, तेव्हा संयम ठेवावा लागतो. काय होणार आहे आणि काय होणार नाही, हे माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही. कोणी काहीही म्हणेल येड्या-गबाळ्यासारखं, त्याला काही अर्थ नसतो.” संदीप देशपांडेंच्या आक्रमक पोस्टनंतर ठाकरे गटाच्या बाजूकडून आलेलं हे पहिले ठोस उत्तर असून, त्यामुळे मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.