'मला बदनाम करायचं ते करा,पण...'; पालकमंत्रिपदावरून डच्चू दिल्यानंतर धनंजय मुंडेंचा पलटवार
विधानसभा निवडणुकीनंतर पालकमंत्रिपदाचा तिढा कायम होता. मात्र अखेर शनिवारी त्यावर शिक्कामोर्तब झालं असून जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांना मात्र पालकमंत्रिपदाच्या शर्यतीतून डच्चू देण्यात आला असून त्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी आज पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे.
बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ‘मकोका’ लावलेला वाल्मीक कराड यांच्याबरोबर कोणतेही आर्थिक संबंध नसल्याचा मुंडेंनी केला आहे. तसचं बीडमधील सध्य परिस्थिती विरोधकांच्या अविचारी विरोधामुळे आहे. मला काय बदनाम करायचे ते करा, पण बीड जिल्ह्याला बदनाम करू नका”, अशी विनंती मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.
मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील नवसंकल्प शिबिराला हजेरी लावली. दरम्यान काल राज्यातील पालकमंत्री पदाच्या नियुक्ती जाहीर झाल्या होत्या. यात मंत्री धनंजय मुंडे यांना संधी मिळाली नाही. त्यातच मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीडमधील संतोष देशमुख हत्येचे प्रकरण गाजत आहे.
या हत्येच्या कटात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय ‘मकोका’मधील आरोपी वाल्मिक कराड अटकेत आहेत. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्यात. महायुतीमधील भाजप आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश साळुंके यांनी बीडमधील हत्येचे प्रकरण उचलून धरले आहे. यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या भोवती अडचणी वाढल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारली आहे. यावर बोलताना मंत्री मुंडे म्हणाले, “बीडची सध्याची स्थिती पाहून मीच अजितदादांना विनंती केली होती. बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी. जसा पुण्याचा विकास झाला, तसा बीडचाही व्हावा. ही माझी भावना आहे”.
विरोधकांच्या भूमिकेवर बोलताना मंत्री मुंडे यांनी त्यांच्या मागणीपेक्षा माझी भावना काय हे महत्वाचं. मी पक्ष नेतृत्वाला विनंती केली. बीडची जबाबदारी आपण घ्यावी. त्यांनी ती स्वीकारली. यातच सर्व काही आले, असेही म्हणाले.