पालकमंत्रीपद न मिळाल्यानंतर मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया (फोटो- सोशल मिडिया)
बीड: राज्यात मागील वर्षी विधानसभा निवडणूक पार पडली. राज्यात जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. खातेवाटप झाले. मात्र पालकमंत्रीपदाचे वाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राजकीय नेत्यांमध्ये अनेक दिवसांपासून पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु होती. शेवटी हा तिढा राज्य सरकारने सोडवला आहे. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांना बीड व कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री देण्यात आले नाही. त्यावरून आता मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील महायुती सरकारने आज पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचा पालकमंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विरोधकानी राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या प्रकरणानंतर मुंडे यांना बीडचे पालकमंत्रीपद मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
दरम्यान पालकमंत्रीपदाच्या यादीमध्ये स्थान न मिळलयानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान त्यांनी ट्वीटमध्ये काय म्हंटले आहे ते पाहुयात.
“बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे. बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती.
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे.
बीड… pic.twitter.com/03SR9zzMXT
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 18, 2025
त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो. सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील.”
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर; कोणता नेता कोणता जिल्हा सांभाळणार?