धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला का? स्वत: च दिलं उत्तर, पंकजा मुंडेंनीही दिली माहिती
बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणावरुन राजकारण तापलं असताना जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीवरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या दरम्यान मुंडेंच्या भेटीगाठींचा धडाका पहायला मिळत आहे. धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवारांकडे दिला असून अजित पवारांनी निर्णय राखून ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यावर त्यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्याकडे ना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा मागितला, ना मी राजीनामा दिला. माझ्या राजीनाम्याच्या बातम्या तथ्यहीन असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. आज आमची विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र, मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत कोणतीच चर्चा नसल्याचं ते म्हणाले. विशेष म्हणजे अजित पवारांच्या भेटीनंतरही धनंजय मुंडेंनी केवळ अन्न व नागरी खात्याचा पदभार स्वीकारल्यामुळे व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचं म्हटलं होतं. मात्र, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याचं वृत्त काही माध्यमांत झळकल्यानंतर मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
तसंच जोपर्यत धनंजय मुंडे यांच्याविरोधात ठोस पुरावा मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांनी काल अजित पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवारांनी ही भूमिका घेतल्याचे समजतं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही. त्याचा अहवाल येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार नाही, अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तत्पूर्वीच अंजली दमानिया यांनी सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर काही वेळातच अजित पवार सागर बंगल्यावर पोहोचले होते. अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली का, यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकली नाही. मात्र, या तातडीच्या गाठीभेटीच्या अनुषंगाने राजीनाम्यावर विचार होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हे काम त्यांच्या पक्षश्रेष्ठींचं आणि मुख्यमंत्र्यांचं आहे. त्यावर आम्ही काही बोलू शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.