
नवोदय प्रवेशात जिल्हा परिषद शाळांचा दबदबा वाढला; धाराशिव जिल्ह्यातून तब्बल...
धाराशिव : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेत यंदा धाराशिव जिल्ह्याने ग्रामीण शिक्षणाच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सहावी इयत्तेसाठी उपलब्ध असलेल्या एकूण ८० जागांपैकी तब्बल ६६ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधून निवडले गेले असून, जिल्हा परिषद शिक्षण व्यवस्थेचा ठसा अधोरेखित झाला आहे. विशेष म्हणजे, निवड झालेल्या ८० विद्यार्थ्यांपैकी तब्बल ७७ विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक तयारी आणि शिक्षकांचे योगदान याचे प्रभावी दर्शन घडले आहे.
तालुकानिहाय निकालात धाराशिव तालुका आघाडीवर असून, येथे २० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यापाठोपाठ तुळजापूर १८, कळंब १३, उमरगा ७, भूम ७, लोहारा ७, वाशी ४ आणि परंडा ४ अशा एकूण ८० विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळांचा वाटा लक्षणीय असून, धाराशिव तालुक्यातील २० पैकी १८, तुळजापूर १८ पैकी १६, कळंब १३ पैकी १२, उमरगा ७ पैकी ४, भूम ७ पैकी ४, लोहारा ७ पैकी ५, वाशी ४ पैकी २ आणि परंडा ४ पैकी सर्व ४ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधूनच निवडले गेले आहेत.
मागील वर्षी जिल्हा परिषद शाळांमधून ६३ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. यंदा हा आकडा वाढून ६६ वर पोहोचल्याने कामगिरीत सातत्याने प्रगती होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या यशामागे जिल्हा परिषदेकडून राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी व स्पर्धा परीक्षेची सवय लागावी यासाठी जिल्हा स्वनियोजित निधीतून ओएमआर पद्धतीवर आधारित दोन सराव परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम निकालात स्पष्टपणे दिसून आला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील, उपाध्यक्ष उषा गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, शिक्षणाधिकारी डॉ. रवींद्र खंदारे तसेच उपशिक्षणाधिकारी कैलास पिकवणे यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले आहे. सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षण विभागातील शिक्षक व मुख्याध्यापकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक क्षमता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जाणीव अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे सुद्धा वाचा : एसटीची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी बहुआयामी उपाययोजना, प्रताप सरनाईकांची माहिती