Dharavi Redevelopment Project : “धारावीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या नावाखाली अदानी समूहाला जमीन दिली जात आहे. यामागे धारावीतील जनतेचे हित नसून, केवळ अदानी समूहाला फायदा मिळवून देण्याचा हेतू आहे.”अशा शब्दांत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून केंद्र सरकारवर आणि अदानी समूहावर जोरदार टीका केली आहे. सोमवारी (९ जून) मुलुंड येथे झालेल्या सभेत त्यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. तसेच, आदित्य ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात आवाज उठवत धारावीतील नागरिकांना पाठिंबा दर्शवला. “तुमची लढाई माझीही आहे,” असे म्हणत त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.
ठाकरे म्हणाले, “जर धारावीतील सर्व नागरिकांना पात्र मानले गेले नाही, तर आम्ही त्यांना धारावीत पाय ठेवू देणार नाही. मी इथे आदेश देण्यासाठी नाही, तर तुमच्यासोबत लढण्यासाठी आलो आहे. ही लढाई लढताना आमच्यावर अनेक खटले दाखल होतील, पण आम्ही मागे हटणार नाही. त्यांच्या छातीवर पाऊल ठेवून आम्ही ही लढाई जिंकू.”
ठाकरे म्हणाले, “ही कुठली मानवता आहे? आम्ही आरेमधून मेट्रो कारशेड हलवून जंगल वाचवू पाहत होतो, तेव्हा केंद्र सरकारने परवानगी दिली नाही. पण आता मात्र मुंबईची जमीन जवळपास मोफत अदानी समूहाला दिली जात आहे.” सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांवरील मालमत्ता कर माफ करण्यात आला होता. मात्र भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.”
ठाकरे यांनी देवनार डंपिंग ग्राउंडच्या हस्तांतरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “बीएमसी ही जमीन देऊ इच्छित नव्हती. मात्र अदानी समूहाने सरकारी संबंधांच्या माध्यमातून ती मिळवली. हे डंपिंग ग्राउंड स्वच्छ केल्यानंतर त्याचा खर्च सामान्य नागरिकांकडून ‘कचरा कर’ स्वरूपात वसूल केला जाणार आहे,” असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, “ही केवळ राजकीय पक्षांची लढाई नाही. मुंबईच्या भवितव्याचा प्रश्न आहे. जर धारावीचे रहिवासी अन्यत्र स्थलांतरित केले गेले, तर धारावीत नक्की काय घडणार? हा प्रश्न प्रत्येक मुंबईकराने विचारला पाहिजे.” असं सांगत आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना जागरूक राहण्याचे आवाहन केले.
अहिल्यानगर हादरलं! फाशीचे Reel शूट झाले Real; तरुणाच्या जीवाशी आला खेळ, प्रकृती चिंताजनक
ठाकरे म्हणाले, “धारावीत विकास हा एका खासगी मालकाकडून केला जात आहे. पण त्या मालकाचे नाव सरकारने स्पष्टपणे जाहीर का केले नाही? जेव्हा मुख्यमंत्र्यांनी धारावीचा मास्टर प्लॅन मंजूर केला, तेव्हा त्या बैठकीत कोणीही मुंबईकर प्रतिनिधी होता का? त्या बैठकीत मुलुंड, कुर्ला किंवा धारावीचा कोणी प्रतिनिधी उपस्थित होता का? जर नसेल, तर हा मास्टर प्लॅन केवळ मालकांसाठीच जाहीर करण्यात आला होता का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ठाकरे पुढे म्हणाले, “मुंबईत एकच धारावी होती, पण आता हे सरकार शहरात अनेक ‘नव्या धाराव्या’ तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. धारावीतील रहिवाशांना वेगवेगळ्या भागात विस्थापित करून त्यांची मूळ ओळख मिटवण्याचे काम सुरू आहे. ही योजना धारावीच्या लोकांच्या हितासाठी नाही, तर इतर व्यावसायिक फायद्यांसाठी आखली जात आहे सरकार धारावीतील रहिवाशांचे पुनर्वसन वेगवेगळ्या ठिकाणी करून त्यांच्या सामूहिक अस्तित्वावर आघात करत आहे. या प्रकारामुळे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पातळीवर धारावीचे नुकसान होणार आहे,” असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. मुंबईकरांनी या सर्व घडामोडीकडे सजग राहावे आणि शहराच्या भविष्याविषयी प्रश्न विचारावेत, असे आवाहनही त्यांनी केले.