महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळत आहे. यातील भाजपच्या वाट्याला दोन, शिवसेना, एक, काँग्रेस एक आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली आहे. मात्र, सहाव्या जागेवर शिवसेना आणि भाजपने दावा केला. त्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सकाळी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरल्याने एका जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात थेट लढत होणार आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. मात्र, शिवसेनेने लाल सिग्नन दाखवल्याने त्यांनी राज्यसभा निवडणुकीचा विषय सोडून दिला. त्यानंतर शिवसेनेने कोल्हापूरचे निष्ठावान शिवसैनिक संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. त्यातच भाजपनेही या जागेवर दावा केला असून हेविवेट राजकीय नेते धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या जागेवर तिढा निर्माण झाला होता.
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनील केदार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी आज सकाळी भेट घेतली. यावेळी, चंद्रकांत पाटीलदेखील उपस्थित होते. दरम्यान, भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केली. राज्यसभा निवडणुकीतून उमेदवार मागे घेतल्यास विधान परिषदेला एक जागा आणखी देऊ, असा प्रस्तावही भाजपला दिला. मात्र, भाजप हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राज्यसभा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे भाजपने महाविकास आघाडीचा प्रस्ताव नाकारल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आता राज्यसभेची ही निवडणूक
थेट शिवसेना आणि भाजपमध्ये होणार आहे.
संख्याबळानुसार काय स्थिती?
सध्या असलेल्या विधानसभा आमदारांच्या संख्याबळानुसार, भाजपचे दोन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. तर, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली अतिरिक्त मते आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या बळावर शिवसेना सहावी जागा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तर, भाजपलादेखील सहावी जागा जिंकण्यासाठी १३ च्या आसपास मतांची आवश्यकता आहे.
आम्हीच जिंकणारः पाटील
इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्याच्याकडे प्रथम क्रमांकांची मते कमी असली तरी विजय होतो. यामुळे भाजपचा उमेदवार विजयी होईल. अपक्ष सदस्य आम्हाला मदत करतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तवला आहे.
घोडेबाजार होऊ नये-राऊत
महाविकास आघाडीने घोडेबाजार होऊ नये, यासाठी प्रयत्न केले. आमच्याकडून राज्यसभेचे चित्र स्पष्ट आहे. मात्र, भाजप उमेदवार मागे घेण्याच्या मनस्थितीत नाही. मविआ ४ उमेदवार निवडून आणेल. आमचाच विजय होईल. अपक्ष आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. ते मविआ सोबतच राहणार आहेत. आता निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागणार आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.