कार्यकर्त्यांचा आधीच जल्लोष; राजवर्धनसह आणि अंकिता पाटील- ठाकरे यांच्या ‘स्टेटस’वर तुतारी
इंदापूर/ सिद्धार्थ मखरे : राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेतील अशी चर्चा सुरु असतानाच हर्षवर्धन पाटील हे कार्यकर्त्यांच्या मनातील निर्णय घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवासस्थानाच्या समोर फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे, लाडू आणि मिठाई भरवत आनंद व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार-शरद पवार, लढेंगे जितेंगे अशा विविध प्रकारच्या घोषणा दिल्या.
दरम्यान हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील व कन्या अंकिता पाटील-ठाकरे यांनी तुतारीचे स्टेट्स आपल्या व्हाट्सअप अकाउंटवर पोस्ट केले आहेत. त्यामुळे पाटील यांचा निर्णय जवळपास सुस्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत नवराष्ट्रला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षवर्धन पाटील उद्या किंवा पर्वा निर्णय जाहीर करतील, असे सांगितले जात आहे.
निर्णयाची उत्सुकता
गेल्या आठवड्यात हर्षवर्धन पाटील यांनी वडापुरी (ता. इंदापूर) येथे बोलताना पितृपंधरवड्यानंतर आपण निर्णय जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर पाटील काय निर्णय घेतील याची उत्सुकता संपूर्ण पुणे जिल्ह्यासह राज्याला लागली होती. परंतु सध्या सुरू असलेल्या घडामोडी पहाता हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करतील याविषयाची फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी असल्याचे दिसून येत आहे.