सातारा : पुसेसावळी येथे आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी (Social Media Post) भडकलेल्या जमावाने प्रार्थनास्थळाजवळील दहा ते बारा जणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. रविवारी रात्री नऊच्या दरम्यान ही घटना घडली. जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी तणाव वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख हे पुसेसावळी येथे तळ ठोकून असून, सुमारे 2000 पोलीस परिसरात तैनात आहेत. परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच पुढील 48 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पुसेसावळी येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर रविवार रात्री उशिरा जाळपोळीची घटना घडली. या घटनेमध्ये तीन ते चार जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र, अद्याप पोलिसांकडून या प्रकरणाची पुष्टी झालेली नाही. काही दिवसांपूर्वी पुसेसावळी येथे काही लोकांनी सोशल मीडियावर देव देवतांच्या आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्या होत्या. पुसेसावळी येथे अंतर्गत दूर होतील त्यातच रविवारी दोन युवकांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे आढळून आले. त्यामुळे पुसेसावळी व परिसरातील युवकांनी या युवकांच्या घरावर दगडफेक केली. त्यांच्या व्यवसायाच्या गाड्या रस्त्यावर आणून मोडतोड केल्या.
तसेच त्यातील काही दुचाकी पेटवून देण्यात आल्या. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. स्थानिक पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली होती. परंतु, परिसरातून मोठ्या प्रमाणावर युवक जमवू लागल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली.
पोलीस अधीक्षक स्वत: घटनास्थळी
साताऱ्यात पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख स्वतः पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाले. प्रोसेस जावळीत ग्रामस्थ भयभीत झाले होते. जमावाने मोठ्या प्रमाणावर येथे दगडफेक केल्याने भीतीचे वातावरण होते.