District level meeting of Raju Shetty's Swabhimani Shetkari Sanghatana in Satara news
Raju Shetty News : सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा बैठक आज सातारा येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. या बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
या वेळी राजू शेट्टी यांनी सांगितले की, जयसिंगपूर येथे होणारी २४ वी ऊस परिषद ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पंढरी आहे. जशी वारकऱ्यांची वारी पंढरपूरला तशी ऊस शेतकऱ्यांची वारी जयसिंगपूरला चुकवू नये, असे आवाहन त्यांनी ऊस उत्पादक बांधवांना केले.
बैठकीत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी नियोजन करण्याचे ठरवले. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने झटत असली, तरी अपेक्षित साथ जिल्ह्यातून मिळत नसल्याचे शेट्टी यांनी नमूद केले. मात्र आता तरुण शेतकरी शेतीमध्ये उतरल्याने अन्याय सहन करणार नाहीत, आणि यंदा ऊसाचा दर ठरवण्यासाठी संघर्ष अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
निसर्गाचा लहरीपणा आणि शेतकऱ्यांची अडचण
या बैठकीत जिल्ह्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीचाही आढावा घेण्यात आला. मे महिन्यापासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पाटण, जावली, वाई, सातारा, कोरेगाव, कराड तालुक्यांमध्ये मशागत आणि पेरणी कोलमडली, तर माण, खटाव, फलटण भागात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला. दुबार पेरणी, खत वापरातील अडचणी आणि उत्पादन घट यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
ऊस दर आणि शेतकऱ्यांची अपेक्षा
सततच्या पावसामुळे ऊस वाढीवरही परिणाम झाला असून यंदा अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकरी ऊसाला योग्य आणि उच्चांकी दर मिळावा, यासाठी सज्ज झाले आहेत. “जर कारखानदार सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न करतील, तर जशास तसे उत्तर देऊ,” असा इशारा बैठकीत देण्यात आला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कर्जमुक्तीचा प्रश्न
बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या आश्वासनाबाबतही चर्चा झाली. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
आगामी निवडणुकांवरही चर्चा
तालुकानिहाय निरीक्षक नियुक्त करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत योग्य उमेदवारांना संधी देण्यासाठी संघटनेची यंत्रणा सक्रिय होणार आहे. या बैठकीस जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य सदस्य अर्जनभाऊ साळुंखे, राज्य प्रवक्ते अनिल पवार, पक्षाध्यक्ष देवानंद पाटील, राज्य सरचिटणीस सुर्यभान जाधव, उपजिल्हाध्यक्ष दादासाहेब यादव, तसेच तालुका अध्यक्ष रमेश पिसाळ,श्री.दत्तुकाका घार्गे ,जीवन शिर्के, बापुराव साळुंखे, प्रमोद जगदाळे, महादेव डोंगर, नितीन कांळगे, उमेश घाडगे,श्री.चंद्रकात काटकर ,श्री.ज्ञानेश्वर अर्जुन आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.