दहावी अन् बारावी परीक्षांचे निकाल १५ मेपर्यंत लागणार
सोलापूर : सध्या दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा सुरू असून, बारावीचा एक तर दहावीचे चार पेपर राहिले आहेत. तरी दहावी व बारावीच्या उर्वरित पेपरसाठी एकाही परीक्षा केंद्रावर मास कॉपी अथवा अन्य कोणताही गैरप्रकार होणार नाही. यासाठी सर्व प्रांताधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार आणि गटशिक्षण अधिकारी यांनी अत्यंत दक्ष राहून परीक्षा सुरळीत पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
दहावी व बारावी बोर्ड परीक्षेच्या उर्वरित पेपरसाठी कॉपी होऊ नये यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप, शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, ‘दहावी-बारावी परीक्षा सुरू झाल्यापासून नागरिक पत्रकार व मान्यवर व्यक्तीकडून काही परीक्षा केंद्रावर कॉपी व अन्य परीक्षेतील गैरप्रकार सुरू असल्याबाबतच्या तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने त्या तक्रारीचे तपासणी केली असता त्यात तथ्य आढळून आलेले आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणेने विशेषत: शिक्षण विभागाने दहावी-बारावीच्या उर्वरित पेपरसाठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून संवेदनशील परीक्षा केंद्राबरोबरच अन्य परीक्षा केंद्रावर कॉपी होणार नाही याची दक्षता घ्यावी’.
तरीही परीक्षा केंद्रावर कॉपी होत असल्याचे आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक यास जागेवरच निलंबित करावे तर संबंधित परीक्षा केंद्र चालकावर गुन्हे दाखल करून ते केंद्र पुढील कोणत्याही परीक्षेसाठीचे बंदी आदेश काढावेत, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.
प्रत्येक उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी त्या-त्या तालुक्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र तसेच कॉपीच्या तक्रारी आलेल्या परीक्षा केंद्र चालकांना बोलावून त्यांच्या केंद्रावर उर्वरित पेपरसाठी कॉपी होणार नाही, याबाबत अत्यंत कठोरपणे निर्देश द्यावेत, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी माळशिरस यांनी शिरपूर येथील परीक्षा केंद्रावर भेट देऊन तेथे कॉपी होत असल्याचे संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले होते, त्या केंद्रावरील पर्यवेक्षक तसेच केंद्र चालकावर त्वरित कारवाई करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.