कोेणाचा काळ कसा आणि कधी येईल हे सांगता नाही. एक क्षुल्लक कारण देखील मृत्यू होण्याचं निमित्त ठरतो. अशीच एक मन पिळवटून टाकण्याऱ्या घटनेने डोंबिवली हळहळतेय. चार वर्षाची चिमुकली आणि तिची मावशी गाढ झोपेत असताना या दोघींना सर्पदंश झाला. डोंबिवलीच्या खंबाळपाड्यातील या घटनेने परिसरातील सरपटणाऱ्या जनावरांबाबत भिती व्यक्त केली जात आहे.
पावसाळ्य़ाचे दिवस असल्याने सरपटणारे प्राणी जागा मिळेल तिथे जातात. अशातच खंबाळपाड्यातील प्राणवी भोईर ही चार वर्षांची चिमुकली आणि तिची मावशी श्रृती यांना सोमवारी पहाटेच्या सुमारास सर्पदंश झाल्याचं उघड झालं. दोघींनाही शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांपुर्वीच या चिमुकलीची प्राणज्योत मालवली. दरम्यान तिची मावशी श्रृती हिच्यावर उपचार सुरु होते मात्र या उपचारांदरम्यान तिचा देखील मृत्यू झाला आहे.
प्राणगीला सर्पदंश झाल्यानंतर कमी वेळातच तिच्या संपूर्ण शरीरात विष भिनलं.प्राणवीला शास्त्रीनगर रुग्णालयात नेताना तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यामुळे तिला तातडीने ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. शास्त्रीनगर रुग्णायलाने वेळीच उपचार सुरु केले असते तर आज प्राणगीचा जीव वाचला असता. सिव्हिल रुग्णालयात दाखल करताना देखील रुग्णवाहिका रुग्णालयाने दिली नाही, असे आरोप प्राणगीच्या कुटुंबियांनी केले आहेत. मात्र शास्त्रीनगर रुग्णालयाने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. खरंतर सिव्हिल रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्राणगीवर तातडीने काही उपचार केले होतो असं शास्त्रीनगर रुग्णायलाचे डॉ. योगेश चौधरी यांनी सांगितलं होतं.
परिसरात दोन निष्पाप जीवांचे बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. क.ल्य़ाण डोंबिवली मनपा हद्दीतील शास्त्रीनगर या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दोघींचा मृत्यू झाला आहे असा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. त्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं आहे. खंबाळपाड्याचा परिरस हा तसा झाडी झुडुपांनी वेढलेला आहे. याआधी देखील असा सर्पदंशाचा प्रकार या भागात घडला होता. या आधी देखील एका शाळकरी मुलला सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू झाला घटना घडली होती. या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या वावराने अनेकांचे जीव धोक्यात असून याबाबत पालिकाप्रशासनाने लवकरात लवकर ठोस पाऊल उचलायला हवं अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.