
DRDO President Dr. Samir Kamat warning-unrealistic-tenders-defence-project-delays-india-dcpp-armoured-platform
पुणे : सुनयना सोनवणे : संरक्षण दलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पांसाठी उद्योग क्षेत्रातील काही कंपन्या अवास्तव आणि अत्यल्प रकमेच्या निविदा भरत असल्याने प्रकल्पांच्या अंमलबजावणीत गंभीर अडथळे निर्माण होत आहेत. सुरुवातीला कमी खर्च दाखवून काम मिळवले जात असले, तरी प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर आर्थिक, तांत्रिक आणि उत्पादनाशी संबंधित अनेक समस्या समोर येतात. परिणामी राष्ट्रीय सुरक्षेशी (Indian Armed Forces) निगडित महत्त्वाचे प्रकल्प रखडतात. त्यामुळे केवळ काम मिळवण्यासाठी स्पर्धा करण्यापेक्षा, प्रकल्पाची खरी गरज ओळखून वास्तववादी खर्चासहच निविदा सादर कराव्यात, असा स्पष्ट इशारा संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) अध्यक्ष डॉ. समीर कामत यांनी उद्योगांना दिला.
भारतीय लष्करासाठी विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘प्रगत चिलखती वाहन’ (ॲडव्हान्स्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्म) अनावरणानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ‘विकास आणि उत्पादन भागीदार’ (डीसीपीपी) प्रारूपाच्या अंमलबजावणीतील अडचणींवर सविस्तर भाष्य केले.
हे देखील वाचा : “भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी..; छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याने रोहित पवारांचा संताप अनावर
डॉ. कामत म्हणाले, ‘संरक्षण क्षेत्रातील प्रकल्प वेळेत पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. उद्योगांनी कमी खर्च दाखवून निविदा जिंकण्याचा प्रयत्न केला, तर नंतर प्रत्यक्ष कामात अडथळे निर्माण होतात. आर्थिक नियोजन, तांत्रिक क्षमता आणि उत्पादन प्रक्रियेत अडचणी येतात. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या योजनांमध्ये अनावश्यक विलंब होतो. ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही उद्योग क्षेत्राकडून सूचना मागवल्या असून, सर्व संबंधितांशी चर्चा सुरू आहे.’
नव्याने विकसित करण्यात आलेले हे प्रगत चिलखती वाहन भारतीय लष्कराच्या आधुनिक युद्धसज्जतेत मोठी भर घालणारे ठरणार आहे. येत्या तीन वर्षांत हे वाहन प्रत्यक्ष लष्कराच्या सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याआधी डीआरडीओकडून वाहनाच्या सखोल विकास चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
वाहनाच्या इंजिनच्या शस्त्रप्रणालींची काटेकोर तपासणी
भारतीय लष्कराचे निकष अत्यंत कठोर असल्याने हे वाहन विविध भौगोलिक परिस्थितींमध्ये सक्षमपणे कार्य करणे आवश्यक आहे. वाळवंटी भागातील तीव्र उष्णता, अतिउंच डोंगराळ भागातील कमी तापमान, खडतर भूभाग आणि प्रतिकूल हवामानातही त्याची कार्यक्षमता अबाधित राहिली पाहिजे. यासाठी वाहनाच्या इंजिन, गतिशीलता, संरक्षक क्षमता आणि शस्त्रप्रणालींची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. ‘चालत्या वाहनातून अचूक मारा करण्यासाठी ‘स्टेबिलाईज्ड फायरिंग’ तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच क्षेपणास्त्र डागण्याच्या क्षमतेची चाचणीही विकास प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग असेल,’ असे डॉ. कामत यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा : पश्चिम घाटातील ड्रॅगनफ्लाय प्रजातींमध्ये ३५ टक्के घट; जैवविविधतेसाठी धोक्याची घंटा
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “सध्याच्या वाहनात एआयचा मर्यादित वापर करण्यात आला असला, तरी भविष्यात त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढवली जाणार आहे. रणांगणावर लक्ष्य ओळखणे, ट्रॅकिंग करणे, शत्रूच्या हालचालींचा वेगाने अंदाज घेणे आणि योग्य शस्त्र प्रणालीची निवड करणे यासाठी एआय अत्यंत उपयुक्त ठरेल.”
‘जवानांचा निर्णय घेण्याचा वेळ कमी करून युद्धातील प्रतिसादक्षमता वाढवणे हे एआयचे सर्वात मोठे योगदान ठरेल,’ असे ते म्हणाले. भविष्यातील संरक्षण तंत्रज्ञानामध्ये ‘डायरेक्टेड एनर्जी वेपन्स’ (लेझर आधारित अस्त्रे), सायबर सुरक्षा, स्वयंचलित प्रणाली आणि पूर्णपणे मानवरहित प्लॅटफॉर्म विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.