आमदार रोहित पवार यांनी धीरेद्र शास्त्रीवर टीका केली (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर बागेश्वर बाबा अर्थात धीरेंद्र शास्त्री हे महाराष्ट्रामध्ये जोरदार चर्चेत आले आहेत. नागपूरमधील एका कार्यक्रमाममध्ये सहभागी झालेल्या धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याची परंपरा कायम ठेवली आहे. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे राज्यातून संपाताची लाट उसळली आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी अशी मागणी केली आहे.
धीरेंद्र शास्त्री यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे राजकीय नेत्यांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे. आमदार रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. रोहित पवार यांनी लिहिले की, “शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडं दिला,” हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
हे देखील वाचा : मीरा-भाईंदरमध्ये राजकीय नैतिकतेचा ऱ्हास; जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकीय वादांना प्राधान्य
पुढे त्यांनी लिहिले की, यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकाऱ्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली होती. वारंवार अशाप्रकारची वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या संत परंपरेला, छत्रपतींच्या इतिहासाला, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावून महापुरुषांचं महत्व कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम तर राबवला जात नाही ना? अशी शंका येते.
हे देखील वाचा : धीरेंद्र शास्त्री पुन्हा बरळला! छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्याने पेटला वाद
भोंदू बागेश्वरकडून शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्यकर्तेही त्या स्टेजवर होते याचं जास्त दुःख वाटतं. शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढं महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल. सरकार या भोंदूवर कारवाई करेल असं वाटत नाही. त्यामुळं ‘सहन करत दुर्लक्ष करायचं की धडा शिकवायचा’, हे आता शिवप्रेमी जनता आणि या सर्व महामानवांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांनीच ठरवायला हवं, असे परखड मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
“शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडं दिला,” हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकाऱ्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली होती. वारंवार अशाप्रकारची वक्तव्ये करून… pic.twitter.com/fruZIuyZXH — Rohit Pawar (@RRPSpeaks) April 25, 2026






