
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात परदेशी भक्तांसाठी ड्रेसकोड; मंदिर प्रशासन निर्णय घेण्याच्या तयारीत
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आणि विठ्ठलभक्त पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरीत दाखल होतात. आता या भक्तांमध्ये परदेशातून येणाऱ्यांचीही संख्या आहे. परदेशी भाविकांनाही विठुरायाच्या दर्शनाची ओढ असते. मात्र, दर्शनासाठी येताना त्यांनी भारतीय संस्कृती आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेशी जुळणारा पोशाख परिधान करावा, अशी भूमिका पुढे आली आहे.
जिल्हाधिकारी SOP तयार करणार
या संदर्भात जिल्हाधिकारी आणि वारकरी महाराज मंडळींच्या सल्लागार परिषदेने एक ठराव मंजूर करून तो मंदिर समितीकडे पाठवला आहे. या ठरावाच्या आधारे वस्त्रसंहितेचे नियम निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परदेशी भक्तांनी कोणत्या प्रकारचा पोशाख परिधान करावा, नियमांचे पालन कसे तपासावे आणि त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी, याबाबत प्रमाणित कार्यपद्धती तयार केली जात आहे.
विठ्ठल-रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू
21 नोव्हेंबर रोजी पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होणार आहे. या यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता आहे. भाविकांना विठ्ठलरुक्मिणीचे सुलभ आणि वेळेत दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर समितीने आजपासून २४ तास दर्शनाची व्यवस्था सुरू केली आहे. त्यामुळे भाविकांना दिवसरात्र विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे. कार्तिकी यात्रा काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता विठ्ठल-रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णयही मंदिर समितीने घेतला आहे.
1. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कोणासाठी ड्रेसकोड प्रस्तावित आहे?
परदेशातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विशेष वस्त्रसंहिता प्रस्तावित आहे.
2. ड्रेसकोड लागू करण्यामागचा उद्देश काय आहे?
भारतीय संस्कृती, धार्मिक परंपरा आणि वारकरी संप्रदायाच्या प्रथा यांना साजेसा पोशाख मंदिरात असावा, हा यामागील उद्देश आहे.
3. ड्रेसकोडचे पालन केल्यास परदेशी भाविकांना काय फायदा होणार?
प्रस्तावानुसार, नियमांचे पालन करणाऱ्या परदेशी भाविकांना दर्शनासाठी थेट प्रवेश देण्याचा विचार आहे.