
द्राक्षबागांवर रोगांचा प्रादुर्भाव
हजारो एकरांवरील द्राक्षबागा रोगट अवस्थेत
द्राक्ष उत्पादकांना डाऊनीचा सर्वाधिक फटका
तासगाव/मिलिंद पोळ: तासगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून चालू असलेल्या ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा अवकाळी पाऊस आणि पहाटेच्या धुक्यामुळे द्राक्षबागांवर गंभीर संकट ओढावले आहे. तालुक्यातील बहुतेक द्राक्षबागांवर डाऊनी मिल्ड्यू, करपा आणि घडकुजी या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असून, हजारो एकरांवरील द्राक्षबागा रोगट अवस्थेत गेल्या आहेत.
तासगाव तालुक्यातील सावळज, मनेराजुरी, बोरगाव, मांजर्डे, वायफळे परिसरातील द्राक्ष उत्पादकांना डाऊनीचा सर्वाधिक फटका बसला आहे. फुलोऱ्यात आणि डिपिंग अवस्थेतील घडांवर पावसाचे पाणी साचल्यामुळे बुरशीजन्य संसर्ग वाढला असून घड कुजण्याची प्रक्रिया सुरू आहे. घडांना पाणी लागले की एका दिवसात कुज सुरू होते आणि संपूर्ण फुलोरा नष्ट होतो, असे काही अनुभवी द्राक्ष उत्पादकांनी सांगितले.
डाऊनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी बाजारातील औषधांवर हजारो रुपये खर्च करत आहेत. मात्र, ही औषधे परिणामकारक ठरत नाहीत. काही औषधांचे दर किलोमागे किंवा लिटरमागे १,००० ते ७,००० पर्यंत असून, दिवसातून दोन फवारण्या करूनही रोग आटोक्यात येत नाही. यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. औषधे फवारल्यावर दोन दिवस ठीक वाटतं, पण नंतर पुन्हा रोग दिसू लागतो. बाग वाचवायची की कर्ज फेडायचं, हा प्रश्न उभा राहिला आहे, असे एका बागायतदाराने सांगितले.
ऊस दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक, वाहनांवर दगडफेक; अनेक पोलीस जखमी
हवामानातील बदल आणि सततचे ढगाळ वातावरण यामुळे रोगाचा प्रसार झपाट्याने होत आहे. पहाटे पडणारे दाट धुके रोगाच्या बीजाणूंना पोषक ठरत आहे. पुढील काही दिवसांत हवामान कोरडे झाले नाही, तर द्राक्ष उत्पादनाचा संपूर्ण हंगाम हातातून जाण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरवर्षी मोठ्या खर्चाने द्राक्षबागा उभारणारे शेतकरी या नैसर्गिक आपत्तीसमोर हतबल झाले आहेत. डाऊनी व घडकुजीने बागांची पाने, घड आणि फुलोरे नष्ट होत असून हंगामातील गुंतवणूक वाया जाण्याची भीती आहे. शासनाने वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर हजारो शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडेल, अशी भावना संपूर्ण तालुक्यातील द्राक्ष उत्पादक व्यक्त करत आहेत.
औषध निरीक्षकांकडून तपासणी करावी
शेतकऱ्यांचा सर्वात मोठा आरोप म्हणजे बाजारात मिळणाऱ्या औषधांच्या दर्जावर कोणतेही शासन नियंत्रण नाही. काही कंपन्यांची औषधे नावालाच असून ती परिणामकारक ठरत नाहीत. हजारो रुपये खर्च करूनही रोगावर नियंत्रण मिळत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने द्राक्षबागांवरील रोगांचा सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, बाजारातील कीडनाशकांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध निरीक्षकांकडून तपासणी मोहिम राबवावी, अशीही मागणी होत आहे.
दर हंगामात लाखो रुपये खर्च करून बाग फुलवतो. या वर्षी बाग जोमात आली होती, पण आता डाऊनी आणि घडकुजीने सगळं उद्ध्वस्त केलं. औषधं फवारली तरी काही उपयोग नाही. हवामान आणि सुमार औषधांमुळे बाग हातातून निसटतेय. सरकारने आमचं ऐकून मदत केली पाहिजे.
-नितीन तारळेकर, द्राक्षबागायतदार, सावळज
बाजारात अनेक कंपन्यांची औषधे उपलब्ध आहेत, पण दर्जा सगळ्यांचा सारखा नसतो. काही शेतकरी कमी दराच्या औषधांकडे वळतात आणि परिणामकारक औषधे टाळतात. तरीदेखील काही कंपन्यांच्या औषधांचा परिणाम कमी झाला आहे, हे खरं आहे. हवामानातील बदलामुळे रोग नियंत्रण कठीण झालंय.
-सिद्धनाथ जाधव कृषी औषध विक्रेता, सावळज (तासगाव.)
सध्याच्या हवामानात द्राक्षबागांना अत्यंत नियंत्रित सिंचन, योग्य वेळी फवारणी आणि जैविक औषधांचा समतोल वापर गरजेचा आहे. शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषधांचा अतिरेक करू नये. योग्य वेळी तापमान वाढले, तर डाऊनीचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो, पण तोपर्यंत शेतकऱ्यांनी दक्षता पाळणे अत्यावश्यक आहे.
-सुधीर निकम, द्राक्ष शेती सल्लागार, डोंगरसोनी (तासगाव)