उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 'माळेगाव'च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल; सर्वत्र एकच खळबळ
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अजित पवार यांच्या या उमेदवारी अर्जाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय येळे यांनी तहसील कार्यालयात दाखल केला. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.
हेदेखील वाचा : Bihar Election : नितीश कुमार यांच्या खांद्यावर भाजपाची बंदूक; शेवटच्या निवडणुकीला शस्त्र बनविण्याचा प्रयत्न
या मेळाव्यात माळेगाव कारखान्याची निवडणूक आपण पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे सांगत मी स्वतः निवडणुकीत उतरणार असल्याचे सूतवाच केले होते. त्याचबरोबर माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदाचा उमेदवार प्रचाराच्या शुभारंभवेळी घोषित करणार असल्याचे जाहीर केले होते.
दरम्यान, अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच अचानक उपमुख्यमंत्री पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
माळेगावची निवडणूक अजित पवारांसाठी ठरणार आव्हानाची
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्र राव तावरे व रंजनकमार तावरे हे दोन नेते नेहमीप्रमाणे एकत्र येऊन उपमुख्यमंत्री पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. माळेगावची निवडणूक अजित पवार यांच्यासाठी आव्हानाची ठरणार आहे. त्यातच स्वतः उमेदवारी दाखल करून पवार कोणती राजकीय खेळी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
21 ते 27 दरम्यान अर्ज करता येणार दाखल
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार २१ मे ते २७ मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तर २२ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी प्रकाश अष्टेकर आणि माळेगावचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.