मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून सध्या राज्याचं राजकारण पेटलं आहे. काल बेळगावच्या सीमेवर झालेल्या राड्यानंतर आता हा वाद चांगलाच चिघळताना दिसत आहे. काल बेळगावच्या सीमेकर महाराष्ट्राचे ट्रकवर हल्ला करण्यात आला. कन्नड गुंडांनी महाराष्ट्राच्या गाडय़ांची नासधूस केलेली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त खेद व्यक्त करत शांत बसणे पसंत केले. वास्तविक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी सीमाप्रश्नावर ठोसपणे भूमिका मांडण्याची गरज असताना ते काहीच बोलताना दिसत नाही. सीमाप्रश्नी एकनाथ मूकनाथ झाल्याचा टोला ठाकरे गटाच मुखपत्र असलेल्या सामनातून लगावण्यात आला आहे.
बेळगावच्या सीमेवर मंगळवारी घडलेल्या प्रकारानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांची तातडीची बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत काय घडले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी मुख्यमंत्री शिंदे यांनी दूरध्वनीवरून नेमकी काय चर्चा केली याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः माहिती देऊन सीमाभागातील मराठी बांधवांना धीर देण्याची आवश्यकता असताना उद्योगमंत्री उदय सामंत यांना माध्यमांसमोर पाठवले.
कर्नाटकात मुख्यमंत्री बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. मुख्यमंत्र्यांवर भाजपचा दबाव असल्याने ते सीमाप्रश्नी ठोस भूमिका घेण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे.